Join us
Daily Top 2Weekly Top 5

धुक्याची नव्हे, धुरक्याची चादर; मुंबईकरांसाठी पुढचे दोन दिवस धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 08:56 IST

गेल्या संपूर्ण महिन्यात दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक गार वारे असा विचित्र बदल शरीराला बाधक ठरत आहे

मुंबई - ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर, मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसाने यात भर घातल्याने तापमान खाली घसरले आहे. याचा परिणाम म्हणून गारठ्यात वाढ झाली आहे. धुरक्यातून वाट काढतच मुंबईकर आपल्या नियोजित स्थळी पोहोचले. अनेकांनी धुक्याचा आनंद म्हणून सोशल मीडियावर या धुरक्याचे फोटो टाकले. मात्र हे केवळ धुके नव्हे, धुरके असून मुंबईच्या हवेची गुणवत्ता शनिवारी वाईट असल्याचे केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर प्रकल्पांतर्गत नोंदण्यात आले आहे. येते दोन दिवस हवेची गुणवत्ता खालावलेलीच राहण्याची शक्यता आहे. बोरिवली, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, माझगाव या चार ठिकाणी हवेचा दर्जा अतिप्रदूषित होता. नवी मुंबईच्या हवेची गुणवत्ताही शनिवारी अतिप्रदूषित स्वरूपाची होती. कुलाबा येथील हवेची गुणवत्ताही वाईट होती. तर मालाड, भांडुप, चेंबूर आणि वरळी येथील हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे. या विचित्र वातावरणामुळे मुंबईकरांचा दम निघाला आहे. ज्यांना श्वसनविकार आहे, अशा रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, तर मुलांमध्ये रात्री खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. आर्द्रता वाढली कुलाबा वेधशाळेत आर्द्रतेचे प्रमाण ९४ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. तर सांताक्रुझ वेधशाळेत आर्द्रतेचे प्रमाण ९५ टक्के नोंदविले आहे. आर्द्रता वाढण्यासह अरबी समुद्रावरील वातावरणातील ओलाव्याचे प्रमाण वाढले आहे. धुके वाढण्यामागचे हेदेखील एक कारण असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. 

उद्या किमान तापमान २२ अंश सेल्सिअस -वातावरणाच्या खालच्या स्तरात धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे धूरक्यात वाढ झाली आहे. धुळीच्या कणांचे वाढते प्रमाण व वातावरणातील इतर घटक यास कारणीभूत आहेत.  रविवारसह सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला.

बदल शरीराला बाधक -गेल्या संपूर्ण महिन्यात दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक गार वारे असा विचित्र बदल शरीराला बाधक ठरत आहे व या बदलामुळे दमा, सुका खोकला आणि रक्तदाब असे विकार नागरिकांमध्ये बळावले आहेत. 

लक्षणे : श्वसनास अडथळा निर्माण होणे, डोळे चुरचुरणे, खाज येणे, घसा बसणे, नाकातून पाणी येणे  

हे करा : घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या, डोक्यावर टोपी घाला, रुमालाने चेहरा झाका, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स घाला, योग्य आहार व व्यायाम महत्त्वाचा  

टॅग्स :मुंबई