भाजपचे नव्हे ‘हिटलर’चे सरकार : मुख्यमंत्री
By Admin | Updated: August 27, 2014 00:42 IST2014-08-27T00:41:51+5:302014-08-27T00:42:17+5:30
वचनपूर्ती मेळावा : टोलमधून ‘एमएच-०९’ च्या गाड्या वगळण्याची मागणी

भाजपचे नव्हे ‘हिटलर’चे सरकार : मुख्यमंत्री
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला एकतर्फी सत्ता दिली परंतु आता देशाची पावले ‘हिटलर’च्या दिशेने पडू लागली आहेत. त्याच विचारांचा या देशाला धोका असून तो रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसच्याच विचारांचे राज्य निवडून द्या, असे आवाहन करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले.
कोल्हापूरला ४८९ कोटी रुपयांची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने ‘वचनपूर्ती’ मेळाव्यात चांदीची तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. येथील कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये आज मंगळवारी रात्री हा समारंभ झाला. त्यामध्ये गृहराज्यमंत्री यांनी टोलमधून ‘एमएच-०९’च्या गाड्या वगळाव्यात, अशी मागणी केली तर माजी आमदार पी. एन. पाटील यांनी टोल रद्द करण्याची मागणी केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर थेट बोलणे टाळले. ‘सतेज अभियान’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेसवरील राग जनतेने लोकसभा निवडणुकीत काढला आता त्याचा त्यांना पश्चाताप होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘देशातील सरकारकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. परंतु पहिल्या शंभर दिवसांचा कारभार पाहता लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. त्याचेच प्रतिबिंब पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने वारे येऊ लागल्याचे दिसत आहे. मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला बसणार नाही, मंत्र्यांना खासगी सचिव नेमण्याचाही अधिकार नाही, अशाप्रकारचा कारभार गुजरातमध्ये सुरू होता, तसाच कारभार आता देशातही सुरू झाला आहे. त्यातून देशाची पावले ‘हिटलर’च्या दिशेने पडू लागली आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर जातीय दंगे-तणाव वाढले, राज्यपालांना अवमानित करून बाजूला करण्यात आले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने अवमान करण्यात आला. ही प्रवृत्ती घातक असून याच विचारांचा देशाला जास्त धोका आहे. लोकसभेत जशी दिशाभूल झाली तसा भडिमार सोशल मीडियामधून पुन्हा होईल. परंतु त्यास आता बळी पडू नका व काँग्रेसच्या सर्वांना पुढे घेवून जाणाऱ्या विचारांनाच पुन्हा संधी द्या.’
गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले,‘थेटपाईपलाईन योजना व्हावी म्हणून कोल्हापुरात गेली पस्तीस वर्षे अनेक दिग्गजांनी मोठा संघर्ष केला. दिवंगत नेते रवींद्र सबनीस, विष्णूपंत इंगवले, के. आर.अकोळकर यांच्यापासून ते धनाजीराव जाधव, गोविंद पानसरे,रामभाऊ फाळके अशी असंख्य नांवे घेता येतील. परंतु ही योजना मंजुरीचे काम काँग्रेसने केले याचा मला आनंद आहे. ’
ते म्हणाले,‘कोल्हापुरातील टोलचा प्रश्न मिटावा ही सर्वांचीच भूमिका आहे. मला मंत्री म्हणून मोर्चात सहभागी होता आले नाही तरी पी. एन. पाटील, मालोजीसह काँग्रेसचे नेते,कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. आता या प्रकल्पाचा मूल्यांकन अहवाल सादर झाला आहे. टोल रद्दच व्हावा अशी आमची मागणी आहे परंतु पहिल्या टप्प्यात किमान ‘एमएच-०९’ च्या वाहनांचा टोल रद्द करण्याचे आदेश द्यावेत. टोल कृती समितीच्या या प्रश्नांतील संघर्षाची आम्हाला जाणीव आहे. त्यांची भूमिका तीच सतेज पाटील यांचीही भूमिका आहे.’
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्रातील सरकार हे सामान्य माणसाचे नाही तर उद्योगपतींचे आहे. देशाच्या इतिहासात लालकिल्ल्यावरून स्वातंत्रदिनी राजकीय भाषण करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. केवळ घोषणा करण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाहीत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, जी योजना तीस वर्षे झाली नाही, त्यासाठी सतेज पाटील यांनी आमदारकी पणाला लावली, असे धाडस करणारा हा एकमेव कार्यकर्ता आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका करत आघाडी झाली तरी सात जागा व नाही झाली तरी दहा जागा लढण्याची आमची तयारी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हे यश मिळाले.एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा, हे सतेज पाटील यांच्याकडूनच शिकावे, असे मालोजीराजे छत्रपती म्हणाले.
स्वागत काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी केले. मेळाव्याला आमदार सा. रे.पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, संजय डी. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, उपमहापौर मोहन गोंजारे, माजी आमदार प्रकाश आवाडे, दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, भरमूण्णा पाटील, सुरेश साळोखे, अॅड. सुरेश कुराडे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, हिंदुराव चौगले, कर्णसिंह गायकवाड, महेश पाटील, डी. सी. पाटील, दिलीप टिपुगडे, संदीप नरके, सत्यजित कदम, आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या आजपासून मुलाखती..
दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्या तरी अजून जागावाटप निश्चित झाले नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,‘काँग्रेस १७४ जागा लढविणार आहे. त्यांच्या मुलाखती उद्यापासून मुंबईत सुरू होत आहेत. कोल्हापुरातील काँग्रेसच्या सर्व सातही जागा निवडून आणण्याची ग्वाही सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
महाडिक अनुपस्थितीत..
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव होते परंतु ते या मेळाव्यास अनुपस्थित राहिले.