Join us  

भीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 4:43 AM

सामान्य नागरिकांचे व इतर मोठ्या देणगीदारांकडून आलेल्या एकूण २८ लाखांची रक्कम बोरीवलीकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. हा आमचा खारीचा वाटा असल्याचे तावडे म्हणाले.

मुंबई : सामान्य बोरीवलीकरांनी आपापल्या कुवतीप्रमाणे जमा केलेला निधी हा पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात आहे. मग ही रक्कम संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खासदार संभाजी राजे यांना केला.तावडे यांनी पूरग्रस्तांसाठीच्या मदतफेरीत डबा वाजवत देणगी गोळा करण्याच्या पद्धतीबद्दल संभाजी राजे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती.मदतफेरी दरम्यान तावडे यांनी डबा वाजवत असल्याचा व्हिडीओ पुढे आला होता. तावडे यांचा हाच व्हिडीओ शेअर करत, संभाजी राजे यांनी नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ का यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय, पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन करणार नाही, अशा शब्दांत संभाजी राजेंनी तावडे यांचा समाचार घेतला होता.यावर तावडे यांनी मंगळवारी खुलासा करत, हा तर जिव्हाळ्याने पुढे केलेला हात आहे. याला भीक म्हणणे म्हणजे पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणाऱ्या जनतेच्या भावनांचा अनादर आहे. सामान्य नागरिकांचे व इतर मोठ्या देणगीदारांकडून आलेल्या एकूण २८ लाखांची रक्कम बोरीवलीकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. हा आमचा खारीचा वाटा असल्याचे तावडे म्हणाले.मंत्र्यांनी लोकांमध्ये जाऊन मदत पाहोचवावीमहाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने ज्या पद्धतीने पूरबाधितांना मदत पोहोचवली व ती लोकांनी स्वीकारली यातून जनतेने नवा आदर्श प्रस्थापित केला. याचा अभ्यास मंत्र्यांनी करावा. छत्रपती घराण्याच्या वतीने एकच सल्ला, लोकनियुक्त सरकारच्या मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावे व प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी, असे संभाजी राजे म्हणाले.

टॅग्स :विनोद तावडे