नामसाधर्म्याच्या उमेदवारांचे पीक
By Admin | Updated: September 29, 2014 00:30 IST2014-09-29T00:30:50+5:302014-09-29T00:30:50+5:30
दमदार उमेदवारांच्या नामसाधर्म्यांचे मतदार शोधून त्यांना निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरवण्याची. तशी तयारी या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही झाली आहे

नामसाधर्म्याच्या उमेदवारांचे पीक
जयंत धुळप, अलिबाग
जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक आली की अधिकृत आणि निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारांच्या विरोधकांची पहिली तयारी असते ती दमदार उमेदवारांच्या नामसाधर्म्यांचे मतदार शोधून त्यांना निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरवण्याची. तशी तयारी या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही झाली आहे. त्यातूनच राज्यातील एक गाजता विधानसभा मतदार संघ असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात चक्क ‘सुनील तटकरे’ निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील दत्ताजीराव तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे या उमेदवाराचे पूर्ण नाव आहे, सुनील श्याम तटकरे. अपक्ष सुनील श्याम तटकरे यांची ओळख रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाली आहे. लोकसभेला अपक्ष सुनील तटकरे यांना १० हजार मते मिळाली होती. रायगडमधून विजयी झालेले खासदार व विद्यमान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते केवळ दोन हजार मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे सुनील दत्ताजीराव तटकरे यांना पराभूत करुन विजयी झाले होते. अपक्ष सुनील तटकरे रिंगणात नसते तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची १० हजार मते बाद झाली नसती आणि अनंत गीते यांना तब्बल आठ हजार मतांनी पराभूत करुन ते विजयी झाले असते. परिणामी नामसाधर्म्याचे उमेदवार धोकादायक असतात हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेले आहे.
सुनील तटकरे नक्कीच विजयी
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे होते. त्यांनी श्रीवर्धनमध्ये प्रचंड प्रमाणात विकास कामे करुन, आपले म्हणजे ‘सुनील तटकरे’ हे नाव या मतदार संघातील प्रत्येक मतदाराच्या मनावर गेल्या पाच वर्षांत अगदी कोरुन ठेवले आहे. आता यावेळी सुनील तटकरे हे उमेदवार असतील तर ते नक्की निवडून येतील ही या मतदार संघातील सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील तटकरे यांच्या ऐवजी त्यांचेच पुतणे अवधूत अनिल तटकरे हे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच ‘अपक्ष सुनील तटकरे’ हे निवडणूक रिंगणात असल्याने, मतदानाच्या वेळी चित्त विचलित करणारी आहे.
विधानसभेला मुळातच पंचरंगी लढती होणार आहेत. परिणामी श्रीवर्धनमधील एकूण २ लाख ४० हजार ३१५ मतदारांपैकी एक पंचमांश म्हणजे ४८ हजार ०६३ मतांपेक्षा अधिक मते मिळविणाराच उमेदवार विजयी होणार आहे.