Join us  

Aarey Forest : ''आरेमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत वृक्षतोड करणार नाही''

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:27 AM

Mumbai Metro Update : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ३० सप्टेंबरपर्यंत वृक्षतोड करणार नाही, अशी माहिती एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी वृक्षांची कत्तल करण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने परवानगी दिली असली, तरी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ३० सप्टेंबरपर्यंत वृक्षतोड करणार नाही, अशी माहिती एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.मेट्रो-३च्या कारशेडसाठी ‘आरे’तील २,६०० झाडे तोडण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने २९ आॅगस्ट रोजी एमएमआरसीएलचा आरे परिसरातील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर केला. याविरोधात वनशक्ती या एनजीओसह अनेक पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे होती.झोरू बाथेना यांनीही वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी घेऊ, असे सांगितले. त्यावर बाथेना यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी वृक्ष प्राधिकरण समितीने एमएमआरसीएलला २,६४६ झाडे तोडण्याची अंतिम मंजुरी १३ सप्टेंबर रोजी दिल्याची माहिती दिली. मात्र, तरीही एमएमआरसीएल पुढील १५ दिवस झाडे तोडू शकत नाही. महाराष्ट्र (शहरी विभाग) वृक्ष संवर्धन व जतन कायद्यांतर्गत प्राधिकरणाच्या निर्णयावर हरकती व सूचना देण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी नागरिकांना द्यावा लागेल, असे द्वारकादास यांनी सांगितले. ‘१५ दिवसांचा कालावधी २८ सप्टेंबरला संपत आहे, परंतु एमएमआरसीएलने ३० सप्टेंबरपर्यंत वृक्षतोड करणार नाही, असे आश्वासन द्यावे,’ असे द्वारकादास यांनी म्हटले.‘आम्हाला हे अधिकृतरीत्या जाहीर करण्याची आवश्यकता नाही. एमएमआरसीएलला वृक्षतोड करायची घाई नाही,’ असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. ‘याचा अर्थ ते ३० सप्टेंबरपर्यंत वृक्षतोड करणार नाहीत,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.बाथेना यांच्या याचिकेनुसार, कारशेडसाठी एमएमआरसीएल २,१८५ झाडे तोडून ४६२ झाडे पुनर्रोपित करणार आहे. हा प्रकल्प जनहिताचा असल्याचे न्यायालयात एमएमआरसीएल व महापालिकेने सांगितले.

टॅग्स :आरेमेट्रो