Join us  

इंदू मिल येथील स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा नको, प्रकाश आंबेडकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:50 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा अचानक ठरलेला कार्यक्रम राज्य सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते.

मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शविला आहे. स्मारकाच्या ठिकाणी पुतळा उभारण्याऐवजी तो निधी लोकोपयोगी कामासाठी खर्च करण्याच्या मागणीचाही त्यांनी यावेळी पुनरूच्चार केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा अचानक ठरलेला कार्यक्रम राज्य सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपला पुतळ्याला विरोध असल्याचे म्हटले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांच्या नावाने धोरणात्मक अभ्यास, संशोधन करणारे केंद्र उभारावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा दिली होती. यासंदर्भात पंतप्रधान म्हणून त्यांनी टिपणही काढले होते. एका पंतप्रधानांनी काढलेले टिपण सहसा अन्य पंतप्रधान बदलत नाहीत. वाजपेयींचे ते टिपण अजूनही मंत्रालयात आहे. त्यामुळे पुतळावगैरे उभारण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळी पडू नये. बाबासाहेबांना पुतळ्यात अडकवण्याचा हा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. वाजपेयींच्या संकल्पनेप्रमाणे या ठिकाणी परराष्ट्र, आर्थिक बाबींचा धोरणात्मक अभ्यासाचे केंद्र झाले असते तर आज भारत-चीन संघर्षात आपली भूमिका जगभर ठसविण्यासाठी भारताला रशियाचा वापर करावा लागला नसता, असा दावाही त्यांनी केला.यापूवीर्ही प्रकाश आंबेडकर यांनी पुतळ्याला विरोध केला होता. .त्या ऐवजी वाडिया रूग्णालयाला हा निधी देण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. दरम्यान, आरपीआय नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेला विरोध केला होता. पुतळा ही समाजाची मागणी आहे, राजकीय नव्हे. या ठिकाणी पुतळ्यासोबत अन्य अनेक उपक्रमही असणार असल्याचे सांगत आरपीआयची भूमिका पुतळ्याच्या बाजूने असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :प्रकाश आंबेडकर