Join us  

उद्धवजी, आम्ही 'तिथे' शिवसैनिकांची वाट पाहिली, पण कोणीच आलं नाही; फडणवीसांचा चिमटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 9:09 PM

उद्धवजी तुम्ही कोणत्या आंदोलनात, मोर्च्यात, संघर्षात होतात? फडणवीसांचा सवाल

मुंबई: वाघांचे फोटो काढून कोणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. उद्धवजी, तुम्ही कधी संघर्ष केलात? कोणत्या आंदोलनात सहभागी झालात? कधी रस्त्यावर उतरलात?, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी अयोध्येला गेलो. बाबरीचा ढाचा पाडला. मी अभिमानानं हे सांगतो. त्याबद्दल तुम्हाला मिरची लागण्याचं कारण काय, असा सवाल फडणवीसांनी विचारला. ते गोरेगावातील हिंदी भाषिक मेळाव्यात बोलत होते.

आम्ही अयोध्येला गेलो होतो. कारसेवक गेले होते. सहलीला चला, सहलीला चला म्हणून त्या कारसेवकांची थट्टा करू नका. देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीच्या ढाच्यावर एक पाय जरी ठेवला असता, तरी बाबरी कोसळली असती, असं उद्धवजी म्हणतात. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशा शब्दांत फडणवीस ठाकरेंवर बरसले.

मै तो अयोध्या जा रहा था.. बाबरी मस्जिद गिरा रहा था.. तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला हाणला. आम्ही बाबरी पाडली. आम्ही ते अभिमानानं सांगतो. त्यावेळी तुम्ही कुठे होतात, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. बाबरी पाडल्यावर आम्हाला बदायूच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथे आम्ही शिवसैनिकांची वाट पाहात होतो. पण कोणीच आलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

उद्धवजी, तुमचं हिंदुत्व गदाधारी आहे म्हणता. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपासून लाथ मारून सोडलं सांगता. अहो उद्धवजी, लाथ कोण मारतो, असा प्रश्न फडणवीसांवी विचारला. बाळासाहेब भोळे होते. मी भोळा नाही, धूर्त आहे, फसणार नाही, असं काही दिवसांपूर्वी उद्धवजी म्हणाले. वाघ हा भोळाच असतो. धूर्त कोण असतो हे सगळ्यांना माहीत आहे. मलाही माहीत आहे. पण मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे