Join us
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता पाचवी ते आठवीच्या पुनर्परीक्षा उन्हाळी सुट्टीत नको, शिक्षकांची मागणी

By रेश्मा शिवडेकर | Updated: March 12, 2024 21:36 IST

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात जाता येईल.

मुंबई- इयत्ता पाचवी-आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा उन्हाळी सुट्टीत घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारात सुधारणा करत शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा बंधनकारक केल्या आहेत.  वरच्या वर्गात जाण्याकरिता विद्यार्थ्यांना या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात जाता येईल.

या पुनर्परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या,  अशी सूचना करण्यात आली आहे. केवळ विदर्भाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्याची मोकळीक आहे. या निर्णयामुळे शालेय नियमावलीप्रमाणे शिक्षकांना देय असलेल्या त्यांच्या हक्काची उन्हाळी रजेवर गदा येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.या परीक्षांकरिता शिक्षकांना वेठीस धरू नये, अशी मागणी टिचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी केली आहे.अडचण काय?शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होते. परंतु, पहिल्याच आठवड्यात पुनर्परीक्षा घ्यायची असल्याने शिक्षकांना या सुट्टीवर पाणी सोडावे लागेल. विद्यार्थी-पालक, शिक्षक यांनी उन्हाळी सुट्टीचे नियोजन आधीच केले आहे. सध्या शिक्षक लोकसभा निवडणुकीत कामात आहेत. त्यामुळे त्यांनी मे-जूनमध्ये सुट्टीचे नियोजन केले आहे. त्यामुळे जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर लगेच पुनर्परीक्षा घेण्याची सूचना शाळांना करण्यात यावी. 

टॅग्स :शिक्षकपरीक्षा