चॅम्पियन्सचा बहिणींशी ‘नो पंगा’
By Admin | Updated: August 29, 2015 09:48 IST2015-08-29T02:44:40+5:302015-08-29T09:48:48+5:30
मैदान गाजवणारे आणि प्रतिस्पर्धींवर तुटून पडणारे प्रो-कबड्डी विजेते बहिणींसमोर मात्र एकदम गुणी भाऊ आहेत. ‘ले पंगा’ केवळ मैदानातच, बहिणींशी मात्र ‘नो पंगा’. यू- मुंबा संघाच्या

चॅम्पियन्सचा बहिणींशी ‘नो पंगा’
मुंबई : मैदान गाजवणारे आणि प्रतिस्पर्धींवर तुटून पडणारे प्रो-कबड्डी विजेते बहिणींसमोर मात्र एकदम गुणी भाऊ आहेत. ‘ले पंगा’ केवळ मैदानातच, बहिणींशी मात्र ‘नो पंगा’. यू- मुंबा संघाच्या विजयाचे शिल्पकार विशाल माने व रिशांक देवडिगा या ‘जय-वीरु’शी आणि त्यांच्या बहिणींशी गप्पा मारताना, त्यांच्यातील प्रेम प्रत्येक शब्दात व्यक्त होते.
‘माझ्या भावाचे यश संपूर्ण देशाने सेलीब्रेट केले. याच क्षणाची आम्ही वाट बघत होतो. आज जर माझे वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता. आपल्या लाडक्या भावाला खेळताना आणि जिंकताना पाहण्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाहीत. ते क्षण माझ्या आयुष्यात आले आहेत,’ असे विशालची बहीण सुचिता माने हिने सांगितले.
‘तो सेलीब्रेटी असल्याने बिझी असतो. पण रक्षाबंधनाच्या दिवशी वेळ काढेल यात शंका नाही. आम्ही चार भावंडे आहोत. विशाल सगळ्यांमध्ये लहान आहे. आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा रुसवे-फुगवे, हसणे-रडणे होतेच. त्या वेळी विशाल सांभाळून घेतो. त्यामुळे त्याने खूप माणसे जोडली आहेत,’ असे सुचिता सांगते.
‘आई-बाबांप्रमाणेच बहिणींनीही माझ्यावर खूप उपकार केले आहेत,’ हे सांगताना विशालचे डोळे पाणावले. स्वत:ला सावरत तो म्हणाला, बहीण ज्या गोष्टीवर हात ठेवेल ती गोष्ट तिला देण्याची माझी इच्छा आहे. पण ती कोणत्याच भेटवस्तूची मागणी करत नाही. तिला भेट म्हणून, माझ्या भाचीच्या भविष्यासाठी मी सेव्हिंग करून ठेवली आहे. जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा हा भाऊ पर्वतासारखा तिच्या पाठीशी उभा असेल.
रिशांक देवाडिगाची बहीण सांगते, ‘मी खूप भाग्यवान आहे, मला रिशांकसारखा भाऊ लाभला. कबड्डीच्या मैदानात आक्रमक खेळणारा रिशांक आयुष्याच्या मैदानात खूप हळवा, समजूतदार, मेहनती आहे. तो तीन वर्षांचा असताना आमचे बाबा देवाघरी गेले. पण आईने आम्हाला बाबांची उणीव भासू दिली नाही. आम्ही भाऊ-बहीण नसून एकमेकांचे सच्चे मित्र आहोत. रक्षाबंधन वगळता इतरही दिवशी तो मला अनेक भेटवस्तू देतच असतो. त्यामुळे ‘खास’ भेटवस्तूची तरी आवश्यकता नाही.’
‘माझ्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी नेहमी तयार असणारी माझी बहीण म्हणजे रेश्मा. मला नेहमी सगळ्या गोष्टींमध्ये तिची साथ मिळत असे. सध्या ती एम.बी.ए. करत आहे. माझे सगळ्यात जास्त हट्ट तर माझ्या बहिणीनेच पूर्ण केले आहेत. सध्या घरात तिच्या लग्नाची चर्चा आहे. तिचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे आहे. ती लग्न करून सासरी जाणार या विचाराने मन हेलावते. पण म्हणतात ना, व्यक्ती दूर गेल्यावर तिचे महत्त्व अधिक जाणवते,’ हे सांगताना रिशांकचे डोळे पाणावले. (प्रतिनिधी)
लहान असल्याचा फायदा घेत तो खूप हट्टी झाला. एखादी गोष्ट त्याला आवडली की ती त्याला हवीच असे. शाळेत असताना नवीन बूट घेण्यासाठी एक बूट तो शाळेत विसरून येई. शाळेपासून घरापर्यंत एका पायात बूट घालून येत असे. मग शेवटी नवीन बूट त्याला मिळत असे.
- रेश्मा देवाडिगा
(रिशांक देवाडिगाची बहीण)
महाविद्यालयात असताना मी कबड्डीचा सराव केल्यानंतर घरी आल्यावर आई वैतागायची. कारण माझे संपूर्ण कपडे मातीने माखलेले असायचे आणि सराव केल्याने खूप भूक लागलेली असायची. हाताला माती लागलेली असल्याने मी बहिणीकडे हट्ट धरायचो मला घास भरव. तेव्हा ती माझा बालहट्ट पूर्ण करत असे. त्या घासाची चव आजही जिभेवर रेंगाळत आहे.
- विशाल माने
(यू-मुंबा स्टार खेळाडू)