Join us

‘पुनर्वसनात धारावीत कोणीही बेघर होणार नाही’, मोकळ्या भूखंडावरील भाडेकरू प्रकल्पाचाच भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 07:48 IST

Dharavi News: मोकळ्या भूखंडावरील भाडेकरूंनाही धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणानंतर घर मिळणार आहे. कुंभारवाडा आणि इतर मोकळ्या भूखंडांचे आधीचे मालक हे धारावी अधिसूचित क्षेत्राचाच (डीएनए) भाग आहेत.

 मुंबई  - मोकळ्या भूखंडावरील भाडेकरूंनाही धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षणानंतर घर मिळणार आहे. कुंभारवाडा आणि इतर मोकळ्या भूखंडांचे आधीचे मालक हे धारावी अधिसूचित क्षेत्राचाच (डीएनए) भाग आहेत. त्यांना पुनर्विकासाचे फायदे मिळणार आहेत.

धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थात डीआरपीच्या स्थापनेसह धारावीतील व्हीएलटी (रिकामे भूखंड)  आपोआप रद्द झाले असले तरी पूर्वीच्या मालकांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांना पुनर्विकास योजनेत पुरेसे संरक्षण मिळाले आहे. 

या योजनेअंतर्गत धारावीतील कोणीही बेघर होणार नाही. कारण प्रत्येक सदनिकाधारकाला त्याचे घर मिळणार आहे, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली. पुनर्विकास करण्याचा भाग  म्हणून पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटापर्यंतचे फ्लॅट मोफत दिले जाणार आहेत.

आता व्हीएलटी जमीन ही डीएनए अंतर्गत येत असल्याने, या भागांचा स्वतंत्र पुनर्विकास करण्याची आवश्यकता नाही, ते डीआरपीच्या कक्षेतच येतात. सर्वेक्षण प्रक्रियेत धारावीकरांकडून पाठिंबा मिळत आहे आणि पूर्ण विश्वास आहे की, माजी ‘व्हीएलटी’ मालक या प्रक्रियेत सहभागी होतील. डीएनएमधील कोळीवाडा आणि खासगी सोसायट्यांसारख्या इतर खासगी जमीन मालकांना पुनर्विकास उपक्रमात सामील व्हावे. - एसव्हीआर श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण 

परळ, दादर, माहीमला व्हीएलटी भूखंडधारावीमध्ये काही खासगी मालकीची क्षेत्रे आहेत. त्यांना या प्रक्रियेत सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ‘व्हीएलटी’ची स्थापना करण्याचा उद्देश हा रिकाम्या जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार ती परत घेता यावी हा होता. मुंबईत अनेक व्हीएलटी भूखंड असून ते बहुधा परळ, दादर, माहीम आणि सायनमध्ये स्थित आहेत, असा अंदाज आहे.

टॅग्स :मुंबई