मुंबई : दादर कबुतरखान्याबाबत बुधवारी १३ ऑगस्टला मुंबईउच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यानंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक मुंबईत होईल, तोपर्यंत जैन समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील अन्य भूतदयावादी तसेच साधूसंतांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नयेत, असे आवाहन अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी समाज बांधवांना केले आहे.
बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याची समीक्षा करून पुढील भूमिका ही एकत्रितपणे ठरवली जाईल, यासाठी समाजाची उच्चस्तरीय बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याचे गांधी यांनी सांगितले. जैन समाजाच्या या उच्चस्तरीय बैठकीमध्ये प्रमुख जैन आचार्याचे मार्गदर्शनही घेतले जाईल. त्यामुळे या बैठकीपूर्वी जैन समाजातील कुणीही माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नये आणि संयम बाळगावा, असे आवाहन गांधी यांनी केले.
दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट याचिका फेटाळण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाकडे अंतरिम आदेशात दुरुस्ती मागण्याचा अधिकार याचिकाकर्त्याकडे कायम ठेवला आहे. त्यामुळे कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा तो उच्च न्यायालयात होईल, असे गांधी यांनी सांगितले.