वनविभागाच्या हद्दीतील नाल्यांना कुणीही वाली नाही!
By जयंत होवाळ | Updated: May 26, 2025 12:02 IST2025-05-26T11:57:17+5:302025-05-26T12:02:42+5:30
सफाईअभावी परिसरात राहणाऱ्या लोकांच्या त्रासाकडे मात्र दुर्लक्ष

वनविभागाच्या हद्दीतील नाल्यांना कुणीही वाली नाही!
जयंत होवाळ
मुंबई : मुंबईच्या विविध भागांतील नाल्यांचा आणि त्यांच्या सफाईचा दरवर्षी मोठा गाजावाजा होतो. पाहणी दौरे होतात. मात्र या नाल्यांव्यतिरिक्त वनक्षेत्राच्या हद्दीतील नाले, त्यांच्या सफाईचा प्रश्न आणि सफाईअभावी त्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या त्रासाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
नाल्यांची वर्षातून दोनवेळा सफाई होते, मात्र वनक्षेत्रातील नाल्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत वनक्षेत्राच्या हद्दीतील सर्वाधिक नाले पूर्व उपनगरातील आहेत. त्यांची सफाई करण्याची जबाबदारी आमची नाही, अशी पालिकेची स्पष्ट भूमिका आहे. नाल्यांची सफाई तातडीने करा, असे पत्र पालिका दरवर्षी वनविभागाला पाठवते. मात्र कार्यवाही होत नाही. पाठपुराव्यानंतर कार्यवाही होते, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
....म्हणून पालिका जबाबदारी घेत नाही
वनविभागाचे कायदे खूप कडक आहेत. त्यांच्या हद्दीतील नाल्यांच्या ठिकाणी प्रामुख्याने तिवरांची झाडे आहेत. नालेसफाई करताना या झाडांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. तसे झाल्यास वनविभाग कारवाई करू शकते. नालेसफाई सुद्धा करायची आणि कारवाईही सहन करायची. त्यापेक्षा या भानगडीत न पडलेले बरे, अशी पालिकेची भूमिका असल्याचे समजते.
वनविभागाच्या हद्दीतील नालेसफाईसाठी पालिका त्यांना दरवर्षी पत्र पाठविते. नालेसफाई व्हावी यासाठी आमच्या स्तरावर पाठपुरावा सुरू असतो - अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील वनविभागाच्या हद्दीतील नाल्याची अनेक वर्षे सफाई झालेली नाही. त्यामुळे येथे डासांची पैदास वाढली आहे. परिसरातील लोकांना डेंग्यू, मलेरिया होणे हे नित्याचेच झाले आहे. वनविभागाकडे सफाईचा अनुभव नसेल तर त्यांनी पालिकेची मदत घ्यावी; पण काहीतरी हालचाल करावी, अशी आमची विनंती आहे - श्याम कदम, सामाजिक कार्यकर्ते