Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतरांच्या आरोग्यासाठी जीव धोक्यात, मिळतात 500 रुपये; गटारात उतरून सफाई करतात कामगार, साधनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 11:40 IST

रस्त्यांवरील सफाईपासून ते आता पावसाळापूर्व कामे शहरात सुरू झाली आहेत. 

मुंबई : मुंबई स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आखून पालिका जितकी महत्त्वाची भूमिका बजावते तितकीच महत्त्वाची भूमिका कंत्राटी नियुक्तीवरील का असेनात पण सफाई कामगार बजावत असतात. रस्त्यांवरील सफाईपासून ते आता पावसाळापूर्व कामे शहरात सुरू झाली आहेत. 

या सफाई कर्मचाऱ्यांना अरुंद, खोल गटारांची सफाई या कर्मचाऱ्यांना हाताने करावी लागते. कंत्राटदारांकडून दिवसाला ५०० रुपये मिळणाऱ्या या सफाई कामगारांच्या आरोग्याकडे मात्र कोणाचेही लक्ष नसते. त्यामुळे इतरांच्या आरोग्यासाठी या सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःचे आरोग्य असुरक्षित असूनही घाणीत झोकून द्यावे लागते. 

पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये, यासाठी गेले दीड महिना विविध भागांत नालेसफाई सुरू आहे. नाल्यांतून निघणाऱ्या गाळाच्या हजारो मेट्रिक टनांच्या आकडय़ांच्या जंजाळात प्रशासन आणि सामान्य नागरिकही गुंतले आहेत. मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत, तर लहान नाल्यातील म्हणजे गटारांमधील गाळ काढण्यासाठी वॉर्ड पातळीवर विविध संस्थांकडून काम करून घेण्यात येत आहे.

कायद्याने बंदी पण काम करावेच लागते

गटारांमध्ये जाऊन साफसफाई करताना अनेक कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे जीव गेल्याने कायद्याने गटारात किंवा अरुंद अशा नाल्यात उतरून साफसफाई करण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्याऐवजी यंत्रांचा आणि अन्य पर्यायांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले असले तरी, लहान गटारांमध्ये अथवा गल्ली-बोळात या मशिनरी जात नसल्याने या कंत्राटी सफाई कामगारांना गटारांमध्ये उतरून ते साफ करावे लागते. 

आजारांचे बळी

पालिकेत ३५ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी आहेत. यातील कंत्राटी कामगारांच्या संख्येची माहिती नसली तरी पावसाळापूर्व कामांसाठी त्यांना कंत्राटदारांकडून रोज ५०० ते ६०० रुपये भत्ता दिला जातो.  मात्र, या दरम्यान दुर्गंधी, घाणीचा परिसर, व्यसनांमुळे हे सफाई कामगार विविध आजाराला बळी पडतात.

संरक्षक साधनांशिवाय सफाई 

घरातील सांडपाण्यापासून शौचालयातील घाणीपर्यंत सर्वच वाहिन्या नाल्यात सोडल्या जात असताना कोणत्याही संरक्षक साधनांशिवाय कामगार गाळात उतरून सफाई करताना दिसतात. मालवणी, गोवंडी, घाटकोपर आणि सहाराच्या आणखी विविध प्रभागात छातीपर्यंत उंच असलेल्या गटारात उतरलेले कामगार हाताने घमेल्यात गाळ भरून गटाराच्या कडेला उभ्या राहिलेल्या कामगाराला देतात. दरम्यान, काम करताना हातमोजे घातले की, ते सैल असल्याने पकड राहत नाही. 

पायालाही जखमा झाल्या तर पटकन कळत नाहीत, म्हणून गमबूट, हातमोजे घातले नाहीत, असे कामगार सांगतात. मात्र, नालेसफाईच्या राजकारणात गुंतलेले नगरसेवक व पालिका प्रशासनाला या कामगारांचा कळवळा येत नाही.  

संरक्षक साधने नसल्याने पालिकेच्या सफाई कामगारांनाही आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. पालिका प्रशासन तेथेही लक्ष देण्यास तयार नाही. कंत्राट देऊन काम करून घेत असलेल्या कामगारांना कोण विचारणार, असे प्रश्न सेवाभावी संस्था उपस्थित करतात.