पोलिसांकडून नोटीस नाही - राऊत
By Admin | Updated: December 22, 2015 00:56 IST2015-12-22T00:56:58+5:302015-12-22T00:56:58+5:30
गँगस्टर अनिल पांडे हत्याकांडप्रकरणी भांडुप पोलिसांनी आमदार सुनील राऊत यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठविली होती

पोलिसांकडून नोटीस नाही - राऊत
मनीषा म्हात्रे, मुंबई
गँगस्टर अनिल पांडे हत्याकांडप्रकरणी भांडुप पोलिसांनी आमदार सुनील राऊत यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठविली होती. तथापि, पोलिसांकडून आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आमदारांच्या या दाव्यानंतर आता पोलीस काय पवित्रा घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय पांडे याची हत्या २५ कोटींच्या कंत्राटावरून झाल्याचेही समोर येत आहे.
भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात कुटुंबीयांसोबत राहत असलेल्या गँगस्टर अनिल पांडे याची ७ जून रोजी घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी तलवारी हल्ला करून हत्या केली. याप्रकरणी कट रचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करत सौरभ खोपडेसह ९ जणांना अटक करण्यात आली होती. तथापि, तपासावर संशय व्यक्त करत पांडे यांची पत्नी प्रिया पांडे हिने वरिष्ठांकडे तक्रार केली. प्रिया यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी क्लीन चिट दिलेले शिवसेनेचे पदाधिकारी सुभाष गुरव आणि गोविंद अनुभवणे उर्फ अण्णा यांच्यासह आमदार सुनील राऊत, गँगस्टर मयूर शिंदे, माजी नगरसेवक सुरेश शिंदे यांचाही या हत्येमागे हात असल्याने त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार भांडुप पोलिसांनी मयूर शिंदे आणि सुरेश शिंदे यांचे जबाब नोंदविले. तर आमदार राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी नोटीस पाठविली. आमदार नोटीस घेत नसून ‘वरिष्ठांशी बोलतो’ असे त्यांनी सांगितल्याची नोंद १० नोव्हेंबर रोजी स्टेशन डायरीत केली आहे. या नोटिसीची तसेच स्टेशन डायरीची प्रत ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.
याबाबत ‘लोकमत’च्या २१ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध होताच, आमदार सुनील राऊत यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून आपला या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे सांगितले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी आपल्याला कुठल्याही स्वरूपाची नोटीस पाठवली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दुसरीकडे पांडेच्या हत्येमागे मुलुंड एलबीएस मार्गावर असलेल्या बड्या व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी माथाडींचे २५ कोटींचे कंत्राट असल्याची माहिती मिळत आहे. पांडे हा माथाडी संघटनेच्या सचिवपदी होता. काँग्रेस नेत्यांच्या मदतीने माथडींचे २५ कोटींचे कंत्राट मिळविण्यात तो यशस्वी झाला होता. तर गँगस्टर शिंदे आणि भोगले हे कंत्राट मिळाले नसल्याने पांडेला हटविण्याचा प्रयत्न करत होते. पांडेने या ठिकाणी आपल्या नावाचे फलकदेखील लावले होते. त्यानंतर भडकलेल्या शिंदेसोबत २० फेब्रुवारीला पांडेचा वाद झाला. पांडे वरचढ होत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी गँगस्टर संधी साधत होते. त्यातूनच पांडेच्या हत्येचा कट आखत त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप पांडेची पत्नी प्रिया पांडेने केला आहे. पांडेच्या हत्येच्या महिनाभरानंतर या बांधकामाचे उपकंत्राट गँगस्टर मयूर शिंदेला मिळाले आहे.
मयूरने दिलेल्या जबाबानुसार, बांधकाम साइटवर पांडेने वर्षभरापूर्वी माथाडी कामगार युनियनचा बोर्ड लावला होता. तसेच येथे माती काढण्याचे कंत्राट एका अन्य खासगी कंपनीस दिले आहे. त्याचे उपकंत्राट मला मिळाले असून वर्कआॅर्डरनुसार तेथे माझे कामकाज सुरू आहे. ६ जून रोजी मी आमदार सुनील राऊत यांच्या कार्यालयात होतो. गेल्या आठ वर्षांपासून सेनेचा पदाधिकारी असून या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले आहे.