Join us  

...यापुढे हिंदमाता परिसराचे ‘नाे टेन्शन’, महिनाभरात होणार पूरमुक्त; आयुक्तांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 7:11 AM

पर्जन्य वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागतील. त्यानंतरच हिंदमाता, परळला पावसात दिलासा मिळेल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी हिंदमाता परिसरात पाणी तुंबले. हा परिसर पूरमुक्त करण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाकी तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. पर्जन्य वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागतील. त्यानंतरच हिंदमाता, परळला पावसात दिलासा मिळेल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

हिंदमाता, परळमध्ये साचणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी टोकिया शहराच्या धर्तीवर भूमिगत टाक्या तयार करण्यात येतील. पहिला प्रयोग हिंदमाता येथे करण्यात येईल. त्यानुसार परळ येथील सेंट झेविअर्स मैदान आणि दादर पूर्व येथील स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानात टाक्या बांधत आहाेत. पहिल्या टप्प्याचे काम पुढील तीन दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, पावसाचा फटका बसला.

हिंदमाता परिसरातील पाणी प्रमोद महाजन मैदानापर्यंत वाहून नेण्यासाठी भूमिगत पर्जन्य वाहिन्या बांधण्यात येत आहेत. रेल्वे मार्गाखालून ही वाहिनी जाईल. ती टाटा मिलमधून बांधण्याच्या कामाला मेच्या अखेरीस परवानगी मिळाली आहे. पुढील ३० दिवसांत ही वाहिनी बांधण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर या भागाला दिलासा मिळेल, असा विश्वास हिंदमाता परिसराच्या पाहणीदरम्यान त्यांनी  व्यक्त केला.

वाहतूक थांबली नाही : हिंदमाता, परळ उड्डाणपुलादरम्यानच्या रस्त्याची उंची चार फुटाने वाढविण्यात आली आहे. दोन्ही पुलांमध्ये कनेक्टर तयार करण्यात आला आहे. ‘रस्त्याची उंची वाढविल्यामुळे यंदा वाहतूक थांबली नाही’, असा दावा पालिका आयुक्तांनी यावेळी केला.

टॅग्स :मुंबईपाऊस