लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचू नये, यासाठी अशा ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना कराव्यात. उपनगरी रेल्वे सेवा अखंड सुरू राहील, यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांमध्ये समन्वय असावा, या दृष्टीने गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या तयारीबाबत माहिती दिली.
पाणी उपशासाठी ४८२ ठिकाणी पंप
सखल भागांत पाण्याचा उपसा करण्यासाठी यंदाही ४८२ ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत. त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा. एखादा पंप जर वेळेत कार्यरत न झाल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली.
‘आजार टाळण्यासाठी दक्षता घ्या’
पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभाग, कीटक नियंत्रण विभाग आणि प्रमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जलजन्य आजार, साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.