मुंबई : मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून जानेवारी ते जूनदरम्यान मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील एकूण ६६५ रुग्णांना सहा कोटी १५ लाख ८९ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या तिन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या रुग्णांना निधीतून मदत दिली जाते. नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे अर्ज वैद्यकीय समितीमार्फत तपासले जातात. पात्र रुग्णांना अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, अर्ज सादर करण्यावेळी रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू असणे आवश्यक आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाची शहानिशा शक्य नसल्यामुळे त्याला अर्थसाहाय्य दिले जात नाही. हृदयदरोग, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, बॉन मॅरो व हाताचे प्रत्यारोपण यावरील उपचारांसाठी तसेच हिप रिप्लेसमेंट, कर्करोग, अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार आदी २० आजारांसाठी मदत दिली जाते.
राज्यातील ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांना मुंबई वा मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्ण, नातेवाइकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन हे कक्ष सुरू केले आहेत. अर्ज प्रक्रिया जलद होण्यासाठी होऊन रुग्णाला तातडीने मदत मिळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करत आहोत. रुग्ण व नातेवाइकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वॉर रूम तयार करणार आहे.रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री साहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
वैद्यकीय खर्च प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला जोडाविहीत नमुन्यातील अर्जासोबत निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, त्यावर सिव्हिल सर्जनची सही व शिक्का, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, आजाराचे रिपोर्ट आदी कागदपत्रे जोडावीत.