Join us

साहेब, रुग्णवाहिकांचे आरोग्य बरे आहे का? विमा आणि पीयूसी नाही; परिवहन विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:19 IST

जीवन-मरणाच्या दारात झुंज देणाऱ्या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवनवाहिनीसारखी असते.

मुंबई :  जीवन-मरणाच्या दारात झुंज देणाऱ्या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवनवाहिनीसारखी असते. मात्र, शहरातील रुग्णवाहिका ‘आरोग्य’ बिघडलेल्या अवस्थेत आहे. कित्येक रुग्णवाहिकाचे विमा आणि पीयूसी नाही; परंतु त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

रुग्णवाहिकांचे दोन प्रकार असतात. सर्वसामान्य प्रकारात रुग्णवाहिकेमध्ये पायाभूत उपचारांच्या सुविधा असतात. दुसऱ्या प्रकारात अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा असते. शहरामध्ये पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची संख्या जास्त आहे. त्यामध्येही सर्वसाधारण यंत्रणा व उपकरणे आवश्यक असतात. यामध्येही खासगी प्रकारात मोडणाऱ्या रुग्णवाहिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. मुंबईत २००० हुन अधिक रुग्णवाहिका आहेत. 

 यामध्ये  काही रुग्णवाहिका मालकांकडून पीयूसी आणि विमा काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

 आरटीओने पीयूसी मोहीम सुरू केल्यानंतर पीयूसी करण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु विमा काढण्याकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

‘आरटीओ’कडून रुग्णवाहिकेच्या सर्व पार्टची तपासणी होते. सुरक्षेशी संबंधित सर्व प्रमाणांवर ही गाडी योग्य असेल, तरच तिला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. 

त्यामध्ये सर्व तांत्रिक गोष्टींबरोबरच ब्रेक, क्लच, लाइट, टायर यांची स्थिती तपासली जाते. दरवर्षी होणाऱ्या या तपासणीला तीनशे रुपये खर्च येतो.

... तर होईल कारवाई

जुन्या रुग्णवाहिकांची नियमित तपासणी होत असते. नव्या रुग्णवाहिकांची दोन वर्षांनंतर आणि जुन्या रुग्णवाहिकांची दरवर्षी तपासणी आवश्यक आहे. नियमानुसार, कोणत्याही वाहनाने फिटनेस तपासणी केली नाही, तर ते अनफिट व बेकायदेशीर वाहन म्हणून घोषित केले जाते.

रुग्णवाहिकांना अडथळा कोंडीचा :

वाहनसंख्या ४५ लाखांहून अधिक असून, दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. या वाहतूक कोंडीमधून रुग्णवाहिकांना वाट काढावी लागते.

टॅग्स :मुंबई