मुंबई - गणेशोत्सव काळात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात परीक्षा घेऊ नका, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची शनिवारी भेट घेऊन दिले. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश तत्काळ जारी करावा आणि त्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच गणेशोत्सव काळात राज्यात कुठेही परीक्षा झाल्यास विद्यार्थी सेना राज्यात आंदोलन करेल, असा इशाराही दिला.
शेलार यांच्या भेटीनंतर ते म्हणाले, राज ठाकरे व मंत्री शेलार हे जुने मित्र आहेत. त्यांच्यातील राजकीय टीका कधीही वैयक्तिक दुरावा निर्माण करणारी ठरली नाही. मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडून तुंबई झाल्याचे संकट नवीन नाही. यावर एकमेव उत्तर राज ठाकरे हेच आहेत. नाशिक महापालिकेत सत्ता असताना केलेली कामे पाहता मुंबई महापालिकेत जनतेने त्यांना संधी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्य सचिवांशी चर्चा करू : शेलारगणेशोत्सवात सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम होत असतात. सर्वांमध्ये उत्साह असतो. अशावेळी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. त्यांची मागणी योग्य असून, त्यासंदर्भात संबंधित विभागांचे मंत्री, सचिव यांच्याशी बोलून मार्ग काढण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.