Join us
Daily Top 2Weekly Top 5

16 जुलैपासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही, खासदार राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 16:54 IST

गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय.

मुंबई- गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूधधंदा तोट्यात गेला आहे, असे असताना दुधाच्या बाबतीत शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे 16 जुलैपासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेन घेतलीय. वेळ प्रसंगी दूध वारकऱ्यांना वाटू पण मुंबईत दूध कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.पुण्यात साखर आणि दूध प्रश्नी 29 जून रोजी मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने याकडे कानाडोळा केलाय. त्यामुळे दूधसंकलन आणि दूध विक्री बंद आंदोलनामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल, पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिलाय. दूध भुकटी, पावडर आणि लोणी जीएसटीमधून वगळावी, अशी मागणीही त्यांनी केली.सध्या दूध उत्पादक ढासळलेल्या दरामुळे आर्थिक संकटात सापडलाय. दुधाचा उत्पादन खर्च 35 रुपये लिटरवर जाऊन पोहोचलाय. मात्र सध्या शेतकऱ्यांना 15 रुपये दर मिळतोय. याबाबत दुधसंघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारला याबाबतची समस्या मांडली होती.यावर सरकारने दुधाच्या भुकटी साठी 3 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 53 कोटी रुपये खर्च ही करण्यात आला आहे. मात्र या 53 कोटी रुपयां पैकी एक रुपयाही दूध उत्पादन करणार्यांना मिळाला नाही. सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असतांना जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच दूध विक्री करायची नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.दूध प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दूध उत्पादकांसाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केले आहे ते आगोदर सांगावे आणि नंतर बोलावे असेही राजू शेट्टी म्हणाले. गोवा आणि कर्नाटक जर दुधाला अनुदान देत असेल तर महाराष्ट्र सरकारला का शक्य होत नाही अस शेट्टी म्हणाले.परराज्यातील दूध देखील महाराष्ट्रात येऊ देणार नाहीराज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर भागातील दूध बंद झाल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक या राज्यांतून मुंबईत दूध आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र गनिमीकावा करून कोणत्याच राज्यातून महाराष्ट्रात दुधाचा एकही थेंब येऊ दिला जाणार नाही. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन वाट्टेल ते करण्याची आमची तयारी असल्याचेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. दूधसंकलनासाठी जबरदस्ती करणार असाल तर गाट स्वाभिमानीशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते अनिल पवार यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :राजू शेट्टी