Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकच मिळेनात; फळांच्या राजालाही कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 05:49 IST

ग्राहक मिळेनात; आंबा उत्पादक हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबाही कोरोनाच्या कचाट्यात अडकला. संचारबंदीमुळे ग्राहकांनी फिरवलेली पाठ, आर्थिक क्षेत्रात अस्थिरतेमुळे निर्यातीवरील परिणाम आणि खराब हवामानामुळे उत्पादनात घट अशा तिहेरी कोंडीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.पहिल्या लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान यंदा भरून निघेल, अशी अपेक्षा असताना खराब हवामानामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले.

फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पाऊस सुरू हाेता. त्यात थंडीचे विषम प्रमाण, भुरी रोगामुळे मोहोर गळून पडला. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या तुलनेत रायगडला याचा अधिक फटका बसला. २० ते २२ टक्केच उत्पादन मिळाले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.कमी उत्पादानामुळे भाव चांगला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र,  काेराेना संसर्ग वाढला, संचारबंदीमुळे ग्राहक कमी झाले. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी गृहनिर्माण संकुलांमध्ये जाऊन आंबा विक्रीचा प्रयत्न सुरू केला आहे. किमान उत्पादनखर्च तरी निघावा, हा यामागचा हेतू आहे.

बनावट हापूसचे पेवकोकणातील हापूस येण्याआधी आंध्र प्रदेश, कर्नाटकातून आंबा बाजारात दाखल होतो. तो दिसायला सारखाच असला तरी चवीला निकृष्ट असतो. मात्र, ३०-४० रुपयांना मिळत असल्यामुळे व्यापारी तोच खरेदी करुन कोकणातील हापूस म्हणून विकतात. त्याचा आर्थिक फटका उत्पादकांना बसत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देत आंध्र आणि कर्नाटकी आंब्यांच्या खोक्यांवर तसा नामाेल्लेख करण्याची मागणी केली आहे. शासनाने एपीएमसीला यासंदर्भात  सूचना दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती मोकल यांनी दिली. यासंदर्भात एपीएमसीचे नवनिर्वाचित सचिव सतीश सोनी यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :आंबाकोरोना वायरस बातम्या