Join us

‘ॲपोकॅलिप्टीक’ नावाचा कोणताही व्हायरस अस्तित्वात नाही, पशुसंवर्धन विभागाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 20:47 IST

ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसून ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असून डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थाने वापरला असावा.

मुंबई - पोल्ट्रीमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीद्वारे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी सांगितले.

ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसून ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असून डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थाने वापरला असावा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवार पशूंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई संस्थेने नमूद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नसल्याचे अनुप कुमारयांनी म्हटले आहे.

डॉ. मायकल ग्रेगर यांच्या लिखीत पुस्तकावर आधारित आहे व डॉ. मायकल ग्रेगर हे आहारतज्ज्ञ असून मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे व सदरील बातमी शास्त्रीयदृष्ट्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. यावरून असे लक्षात येते की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे व भविष्यात असा एखादा व्हायरस येऊ शकतो अशी कल्पना डॉ. मायकल यांनी मांडल्याचे दिसून येत असल्याचे अनुप कुमार यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमेरिकासरकार