ना विकास क्षेत्रातील अनधिकृत वाहनतळ विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 02:07 IST2020-12-02T02:07:02+5:302020-12-02T02:07:12+5:30
या जागेवरील अनधिकृतपणे गॅरेज, भराव व झाडांची कत्तल या वाहनतळासाठी करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा हा वाहनतळ आजही सुरू आहे.

ना विकास क्षेत्रातील अनधिकृत वाहनतळ विरोधात आंदोलन
मुंबई : गोरेगाव (पूर्व) मोहन गोखले रोड येथील ना विकास क्षेत्रातील भुखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत वाहनतळ व अनधिकृत व्यवहार विरोधात प्रभाग क्रमांक ५२च्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका प्रीती सातम यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिक आंदोलन करणार आहेत.
गोरेगाव (पूर्व) मौजे पहाडी सिटीएएस नंबर ५९६ मोहन गोखले रोड वरील धीरज वॅली टॉवर्स समोर ना विकास क्षेत्रातील राखीव भूखंडावर गेल्या अनेक महिन्यापासून टाळेबंदीचा फायदा उठवून मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहनतळ उभा करण्यात आला असून यासाठी पी दक्षिण विभागाने कारवाई केली नाही.
या जागेवरील अनधिकृतपणे गॅरेज, भराव व झाडांची कत्तल या वाहनतळासाठी करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा हा वाहनतळ आजही सुरू आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होऊनसुद्धा आजही हा अनधिकृत वाहनतळ सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅनिटी व्हॅन व अन्य गाड्यांचे पार्किंग होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून त्यांच्या तक्रारीवरून यासंदर्भात स्थानिक नगरसेविका म्हणून मी अनेक महिने पाठपुरावा करूनसुद्धा समाधानकारक कारवाई होत नाही.
नागरिकांच्या या संतप्त भावनेची दखल घेऊन याविरोधात गोरेगाव प्रभाग क्रमांक ५२ मधील नागरिकांच्या समवेत बुधवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. पालिकेच्या पी दक्षिण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून या ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा लेखी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाला नागरिकांच्यावतीने दिला आहे.