एनएमएमटीच्या बसवर दगडफेक
By Admin | Updated: July 2, 2015 23:31 IST2015-07-02T23:31:58+5:302015-07-02T23:31:58+5:30
नुकत्याच सुरू झालेल्या कोप्रोली-जुईनगर एनएमएमटीच्या धावत्या बसवर गुरुवारी अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त

एनएमएमटीच्या बसवर दगडफेक
चिरनेर : नुकत्याच सुरू झालेल्या कोप्रोली-जुईनगर एनएमएमटीच्या धावत्या बसवर गुरुवारी अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली असून उरण पोलीस तपास करत आहेत.
सकाळी साडेदहाच्या वाजण्यास कोप्रोलीकडे येणाऱ्या बसवर बामर लॉरी कंपनीजवळ ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तीन ते चार समाजकंटकांनी धावत्या बसवर दगडफेक केली. यावेळी या समाजकंटकांनी तोंडाला फडके बांधले असल्याचे प्रवाशांनी सांगितले. कोप्रोली-जुईनगर ही एनएमएमटीची बस बुधवार १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे पूर्व भागातील लोकांना नवी मुंबई अथवा मुंबईत जाणे सोयीस्कर झाले आहे. मात्र बस सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच बसवर दगड फेकण्यात करण्यात आल्यामुळे ही बससेवा कितपत सुरू राहील याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी कोप्रोली ते वाशी अशी एनएमएमटी बस सुरू करण्यात आली होती. मात्र रिक्षा चालकांच्या विरोधामुळे ही बस बंद करण्यात आली. (वार्ताहर)