एनएमएमटीच्या भाडेवाढीस ब्रेक
By Admin | Updated: May 21, 2014 05:11 IST2014-05-21T05:11:04+5:302014-05-21T05:11:04+5:30
जवळपास एक वर्षापासून सुरू असणारा एनएमएमटीच्या तिकीट दरवाढीचा घोळ अखेर मिटला आहे
एनएमएमटीच्या भाडेवाढीस ब्रेक
नवी मुंबई : जवळपास एक वर्षापासून सुरू असणारा एनएमएमटीच्या तिकीट दरवाढीचा घोळ अखेर मिटला आहे. नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे कारण देणार्या सत्ताधार्यांनी दरवाढ थांबविली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी उपक्रमाचा तोटा मात्र वाढणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक महिन्याला उत्पन्नापेक्षा जवळपास पावणेदोन कोटी रूपये खर्च जास्त होत आहे. नुकसान भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. सदर ठराव प्रथम परिवहन समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्यावेळी काँगे्रस सदस्या सुदर्शना कौशिक यांनी विरोध केला होता. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. दरवाढीला पर्याय नसल्याचे कारण सांगून ठराव मंजूर करण्यात आला होता. यानंतर सर्वसाधारण सभेमध्येही चर्चा न होताच हा प्रस्ताव मंजूर करून मंजुरीसाठी पाठविला. प्राधिकरणाने दरवाढीला मंजुरी दिल्यानंतर २० मे पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार होती. याविषयीचे प्रसिद्धीपत्रक सोमवारी माध्यमांना पाठविण्यात आले होते. परंतु नंतर एक तासामध्ये तत्काळ तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी सभापती मुकेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता जनतेवर दरवाढीचा भुर्दंड बसू नये यासाठी दरवाढ थांबविली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)