फुकटय़ा प्रवाशांविरोधात एनएमएमटीची मोहीम
By Admin | Updated: October 30, 2014 00:21 IST2014-10-30T00:21:57+5:302014-10-30T00:21:57+5:30
तोटय़ात चाललेल्या परिवहन उपक्रमाला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाने कंबर कसली आहे.

फुकटय़ा प्रवाशांविरोधात एनएमएमटीची मोहीम
नवी मुंबई : तोटय़ात चाललेल्या परिवहन उपक्रमाला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून एनएमएमटीच्या बसेसमधून विनातिकीट प्रवास करणा:या फुकटय़ा प्रवाशांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत गेल्या नऊ महिन्यांत जवळपास पावणोपाच हजार फुकटय़ा प्रवाशांकडून जवळपास 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे परिवहन सेवेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
एनएमएमटीच्या ताफ्यातील 360 पैकी 280 साध्या, 10 मिनी बस आणि 70 वातानुकूलित बसेस एकूण 44 मार्गावर धावतात. असे असले तरी ढिसाळ कारभारामुळे या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्याला सावरण्याचे कोणतेही प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली ही सेवा पूर्णत: कोलमडून पडली आहे. बसेसची दुरवस्था झाली आहे. तर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या बस थांब्यावर विविध जाहिरात कंपन्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूणच शहरातील परिवहन उपक्रम प्रवाशांच्या दृष्टीने फेल ठरताना दिसत आहे. महापालिकेच्या अनुदानावर चालणा:या या उपक्रमातील तोटा भरून काढण्याचा एक भाग म्हणून व्यवस्थापनाने या वर्षीच्या सुरुवातीपासून फुकटय़ा प्रवाशांवर आपली करडी नजर रोखली आहे. अशा प्रवाशांना प्रतिबंध घालण्यासाठी व्यवस्थापनाने तिकीट निरीक्षकांची अतिरिक्त भरती केली आहे. त्याद्वारे विविध मार्गावर मोहीम हाती घेऊन फुकटय़ा प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. मागील नऊ महिन्यात 4775 फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातून जवळपास 5 ते 5.25 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत कारवाईचा आकडा अधिक आहे. (प्रतिनिधी)