Join us  

कलाकार पोहोचले तरीही एसी बंदच का असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 9:48 AM

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाविषयी प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ आपल्या भेटीला आल्या आहेत.

निवेदिता सराफ, अभिनेत्री, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रबोधनकार ठाकरे हे व्यवस्थापनाच्या बाबतीत मुंबईतील एक चांगले नाट्यगृह आहे. मेकअप रूमची स्वच्छता नीट केली जाते. अशोक सराफांपासून आम्ही बरेचसे कलाकार प्रयोगापूर्वी तासभर अगोदर नाट्यगृहात पोहोचतो; पण मेकअप रूममधली वातानुकूलित यंत्रणा सुरू केली जात नाही. प्रबोधनकारला सेंट्रलाइज एसी सिस्टम असल्याने ते प्रयोगापूर्वी अर्धा तास सुरू करतात. हा नियम कोणी व का ठरवला? नाटक वेळेवर सुरू होण्यासाठी आम्ही तास-सव्वातास अगोदर येतो, मग एसी अर्धा तास अगोदर का सुरू केला जातो? कलाकार आल्यावर का सुरू करत नाही? उन्हाळ्यात खूप त्रास होतो. चेहरा तेलकट झाल्यास मेकअप टिकत नाही.

या नाट्यगृहात पहिला नाट्यप्रयोग संपल्यानंतर दुसऱ्या प्रयोगाचे कलाकार येण्यापूर्वी मेकअप रूम नीट स्वच्छ केल्या जातात. स्त्री कलाकारांच्या मेकअप रूममध्ये कचऱ्याचा डबा आहे, जो महाराष्ट्रातील ९० टक्के नाट्यगृहांमध्ये नसतो. लेडीज मेकअप रूमना ॲटॅच्ड स्वच्छतागृह असून, त्याची कडी नीट लागते. ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. ड्रेसिंग टेबलचे टॅाप मार्बलचे असल्याने ते स्वच्छ करणे सोपे जाते. कलाकारांचे कपडे टांगण्यासाठी एक स्टँड आहे. बऱ्याचशा नाट्यगृहांमध्ये स्टँडच नसतात. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकात आम्ही सहा अभिनेत्री आहोत. त्यामुळे सहा जणींचे कपडे कसे लावायचे, हा प्रश्न इतर नाट्यगृहांमध्ये सतावतो; पण प्रबोधनकारमध्ये नाही.

बऱ्याचशा नाट्यगृहांमध्ये जेव्हा मेकअप रूममध्ये चांगल्या लाइट्स नसतात. त्या का नसतात, हे कोडे आहे. इथेही लाइट्स नसतात. त्यामुळे तिथे गेल्यावर ॲक्टिंग करायचे बाजूला ठेवून अगोदर या गोष्टींसाठी झगडावे लागते. माझा मेकअप मीच करते; पण लाइट्स नीट नसल्याने दिसत नाही. व्यवस्थापनातील कोणाला तरी बोलावून ते करून घ्यावे लागते. जशी स्वच्छतेची काळजी घेतली जाते, तशी लाइट्सचीही सोयही न सांगता करायला हवी. प्रत्येक वेळी आम्ही सांगण्याची गरज का भासते? हे कळत नाही.

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाविषयी प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ आपल्या भेटीला आल्या आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

लेपल माइक शक्य होत नाहीत

साउंड सिस्टम खूप चांगली आहे. अलीकडे बऱ्याच नाटकांमध्ये लेपल माइक वापरावा लागतो; पण ‘वाडा चिरेबंदी’मध्ये आम्ही १० कलाकार असल्याने लेपल माइकचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे नाट्यगृहाच्या माइक व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागते. या नाट्यगृहात ॲकॉस्टिक्स चांगले आहे. फिडबॅकचे स्पीकर्सही उत्तम आहेत. धुळीवर नियंत्रण ठेवले जाते. तात्पुरती मेकअप रूम उभारावी लागते. प्रेक्षकांमधल्या खुर्च्या सुस्थितीत आहेत. पार्किंगची सोय चांगली आहे. विंगेत दोन्ही बाजूला चांगली जागा असल्याने काही प्रॉब्लेम येत नाही. माझ्यासाठी दोन्ही नाटकांमध्ये विंगेत दोन्ही बाजूला तात्पुरती छोटी मेकअप रूम उभारावी लागते. त्यासाठीही इथे भरपूर जागा आहे. स्पॉट्स लावतानाही काही समस्या येत नाहीत. सेटसची ने-आण करणेही सोयीचे आहे. त्यामुळे इथे नाटक करायला आणि बघायलाही आवडते.

प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया...

दिव्यांगांची या नाट्यगृहात मोठी गैरसोय होते. रॅम नसल्याने व्हीलचेअर आत नेता येत नाही. पार्किंगची सोय असली तरी तिथले दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता राखण्याची गरज आहे. नाट्यगृहाच्या आवारात जागा असल्याने त्याचा सुशोभीकरणासाठी वापर केल्यास नाट्यगृहाचा परिसर सुंदर दिसेल.

 

टॅग्स :नाटकनिवेदिता सराफ