कोकणातील सर्व बंदरे रेल्वेसेवेने जोडणार- नितीन गडकरी

By Admin | Updated: August 25, 2014 00:02 IST2014-08-24T23:57:39+5:302014-08-25T00:02:53+5:30

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील पुलांचे भूमिपूजन; केंद्र देणार पाच हजार कोटी

Nitin Gadkari will link all the ports in Konkan with railway services | कोकणातील सर्व बंदरे रेल्वेसेवेने जोडणार- नितीन गडकरी

कोकणातील सर्व बंदरे रेल्वेसेवेने जोडणार- नितीन गडकरी

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर महत्त्वाची १२ बंदरे आहेत. त्यातील ८ बंदरे मोठी असून कोकणातील औद्योगिक तसेच पर्यटन विकासासाठी ही सर्व बंदरे रेल्वेने जोडली जातील. त्यासाठी कोकणवासीयांनी संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, नौकानयन व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्र सरकारकडून पाच हजार कोटी रुपये दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावातील सप्तलिंगी पुलाजवळ महामार्ग चौपदरीकरणातील १२ पूल व रेल्वेमार्गावरील दोन उड्डाण पूल यांचे प्रातिनिधिक भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, प्रमोद जठार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने, अजित गोगटे, आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, इंदापूर ते झाराप या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण डांबरीऐवजी सिमेंट कॉँक्रिटचे केले जाणार आहे. या चौपदरीकरणात ज्यांच्या जागा जाणार आहेत, त्यांच्या जमिनीचा चांगला मोबदला दिला जाईल. भूसंपादनासाठी हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापेक्षाही आणखी पैसे लागल्यास केंद्र सरकार ते देणार आहे. प्रत्यक्ष चौपदरीकरणासाठी चार हजार कोटी केंद्र देणार आहे. त्यामुळे हे काम त्यावरील पुलांसह येत्या दोन वर्षांत
पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. आवश्यकतेनुसार रुंदीकरणाबाबत काही ठिकाणी शिथिलता दिली जाईल.
खासगी तत्त्वावर काम करण्यास दिलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर्स रस्त्याचे ३० टक्केही काम झाले नसल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. कोकणात स्मार्ट सीटी उभी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. दहा वर्षांत दहा हजार लोकांचे बळी गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कोणीही थांबवू शकत नाही, असे खासदार राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)


नरिमन पॉइंट ते शिर्डी विमानसेवा सुरू करणार
मुंबई नरिमन पॉइंट ते शिर्डी अशी समुद्राच्या पाण्यात उतरणाऱ्या विमानाची सेवा लवकरच सुरू होणार आहे. पाण्यात व जमिनीवर हे विमान उतरू शकते. येत्या काही कालावधीत मुंबई-नरिमन पॉर्इंटवरून अशीच सेवा कोकणसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

आरटीओ व्यवस्था बंद करणार
देशभरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची केंद्र बनली आहेत. ही व्यवस्था बंद केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहने अडविणारे पोलीसही दिसणार नाहीत. नको ती ‘गांधी’गिरी (गांधींचे चित्र असलेली नोट घेण्याची गांधीगिरी) त्यामुळे बंद होईल. येत्या
संसद अधिवेशनात याबाबत विधेयक आणून मंजूर केले जाणार असल्याचे
गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले.....
-महामार्गाच्या दुतर्फा स्थानिक उत्पादने विक्रीसाठी ‘रोड साईड अ‍ॅमिनिटी सेंटर्स’
-कोकणातील सागरी महामार्गही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्याद्वारे कोकण जागतिक पर्यटन केंद्र बनविणार
-रस्त्यालगतची झाडे स्थलांतरित करणार
-कोकणातील प्रत्येक गाव नरेगा योजनेतून हिरवेगार बनवा.
-कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस् विकसित करणार.
-मरिन इंजिनिअरिंंगचे सर्व अभ्यासक्रम चेन्नई मुख्य केंद्रामार्फत रत्नागिरीत
सुरू करण्याची तयारी.

नागपूर-रत्नागिरी मार्ग चौपदरी
नागपूर-सोलापूर-मिरज-कोल्हापूर-रत्नागिरी या ८०० किलोमीटर्स महामार्गाचेही चौपदरीकरण सिमेंट कॉँक्रिटद्वारे होणार असून, त्यासाठी १० हजार कोटींचा खर्च करावा लागणार. चौपदरीकरणाबाबतची कार्यवाही सुरू असून त्यामुळे नागपूर-कोल्हापूरशी कोकण थेट जोडले जाईल.

Web Title: Nitin Gadkari will link all the ports in Konkan with railway services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.