Join us  

नोटाबंदीत गरीब भरडले गेले, नितीन गडकरींनी मान्य केले उपकारच म्हणायला हवेत - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 8:28 AM

नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान दिली. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नितीन गडकरींचं अभिनंदन करत भाजपाला मात्र पुन्हा एकदा फटकारलं आहे.

मुंबई -  नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान दिली. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. राष्ट्रीय कारागिर पंचायततर्फे आयोजित कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींनी हे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जरी नोटाबंदीचं समर्थन करत असले तरीही नितीन गडकरी यांनी नोटाबंदीमुळे  मध्यमवर्गीय व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली, अशी कबुली दिली. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नितीन गडकरींचं अभिनंदन केले आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन भाजपाला फटकारले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीचा त्रास झाल्याची कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरी हे मोदी सरकारातील ज्येष्ठ व कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. ते स्पष्ट व परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गडकरींचे बोलणे नेहमीच गांभीर्याने घेतले जाते, पण त्याच वेळी आणखी एक ज्येष्ठ मंत्री अरुण जेटली यांनी वेगळे मत मांडले आहे. नोटाबंदीचा अपेक्षित परिणाम झाल्याचे जेटली यांनी सांगितले आहे. दोन मंत्र्यांची दोन भिन्न मते आहेत. नोटाबंदीमुळे विकास दर घटला आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारीने कळस गाठला आहे हे सत्य असले तरी सरकारला ते मान्य नाही. हिंदुस्थानींच्या जगण्याच्या आकांक्षा वाढल्या आहेत असे अर्थमंत्र्यांचे मत आहे. गडकरी सांगतात ते खरे मानायचे की जेटली यांच्यावर भरवसा ठेवायचा ते भाजप प्रवक्त्यांनी सांगायचे. नोटाबंदीचा त्रास सर्वसामान्य जनतेलाच झाला हे आता जसे गडकरी बोलले तसे शरद पवारही बोलत आहेत, पण तेव्हा सगळेच नोटाबंदीच्या तालावर डोलत होते व टाळचिपळय़ा वाजवीत होते. नोटाबंदीस विरोध केला म्हणून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून रघुराम राजन यांना पायउतार व्हावे लागले. रघुराम राजन हे एक भुक्कड व बेअक्कल अर्थतज्ञ असल्याचे तेव्हा सांगण्यात आले, पण तेच रघुराम राजन अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत होते. नोटाबंदी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल असे ठाम मत त्यांनी मांडले होते. परिणामांची पर्वा त्यांनी केली नाही. २००८मध्ये आलेल्या जागतिक मंदीचे पहिल्यांदा भाकीत करणारेही आपले रघुराम राजनच होते; पण आपण त्यांना वाईट पद्धतीने घालवले व देशाच्या अर्थव्यवस्थेचे साफ नुकसान करून घेतले. नोटाबंदीमुळे श्रीमंतांचे अजिबात नुकसान झाले नाही. काळा पैसा पांढरा करण्याचाच तो एक डाव होता व त्यात काही मोजक्या धनाढ्य मंडळींची कशी चांदी झाली व त्यातून काही मंडळींच्या संपत्तीची कशी भरभराट झाली हे आता उघड झाले आहे. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत. आम्ही परखड गडकरींचे अभिनंदन करीत आहोत.

टॅग्स :उद्धव ठाकरेनोटाबंदीनितिन गडकरी