गावे घाण झाल्यावर ‘निर्मल’ पुरस्कार
By Admin | Updated: December 11, 2014 23:46 IST2014-12-11T23:31:56+5:302014-12-11T23:46:13+5:30
केंद्र शासनाचा कारभार : ५८७ पैकी राज्यातील ३५५ गावांना पुरस्कार

गावे घाण झाल्यावर ‘निर्मल’ पुरस्कार
विश्वास पाटील - कोल्हापूर -केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या ‘निर्मलग्राम’ पुरस्कारांची घोषणा झाली असून, देशभरातील ५८७ ग्रामपंचायतींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासाठी महाराष्ट्रातील ३५५ गावांची निवड झाली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २४ गावांचा समावेश त्यामध्ये आहे. हे पुरस्कार २०१३ चे. त्यांची तपासणी झाली एप्रिल २०१४ मध्ये आणि पुरस्कारांची घोषणा डिसेंबरमध्ये झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निर्मल झालेली गावे पुन्हा घाण झाल्यावर पुरस्कार जाहीर झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
केंद्रीय मंत्रालयाचे संचालक सुजय मुजुमदार यांनी पाच डिसेंबरला या गावांची ‘निर्मलग्राम’ म्हणून घोषणा केली. या यादीत एकट्या महाराष्ट्रातीलच ६० टक्के गावे आहेत. त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान हातो. त्यांना लोकसंख्येनुसार चार ते दहा लाखांपर्यंतचे बक्षीस दिले जाते. खरेतर फक्त या योजनेत सहभागी झाल्यावरच गावे स्वच्छ न होता ग्रामस्थांना व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेची सवय लागली पाहिजे, हा या योजनेचा गाभा. परंतु ,बहुतांश गावांत लोक फक्त योजनेपुरतेच वर्ष स्वच्छतेला महत्त्व देतात व एकदा पुरस्कार मिळाला की, पुन्हा ये रे माझ्या मागल्या...अशी स्थिती होती.
पुरस्कारप्राप्त गावांची संख्या
कोल्हापूर - ०३, सांगली - १९, सातारा - ०२, रत्नागिरी - ०४, सिंधुदुर्ग - २७, अहमदनगर - ०९, अमरावती - २१, बीड - ०९, चंद्रपूर - ०२, धुळे - ०५, हिंगोली - २६, जळगाव - १३, जालना - ६३, लातूर - ५३, सोलापूर, नांदेड व यवतमाळ प्रत्येकी - ०१, नंदूरबार - ०२, नाशिक, परभणी - १२, पुणे - ३०, रायगड - १६, ठाणे - ११, वर्धा - १५.
२९ गावे ‘निर्मल’ पासून दूरच
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, कळंबा तर्फ ठाणे व चिखली या करवीर तालुक्यांतीलच तीन गावांना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र शासनाने त्याची आता घोषणा केली असली, तरी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वीच या गावांची निर्मलग्राम म्हणून घोषणा केली होती. बरेच प्रयत्न करूनही जिल्ह्यातील २९ गावे अद्याप निर्मलग्राम झालेली नाहीत. त्यामध्ये शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांतील जास्त गावांचा समावेश आहे. संजय मंडलिक हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना गावे दत्तक देऊन ती निर्मलग्राम करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही फारसे यश आले नाही. त्यानंतर हे काम ठप्पच आहे.
गावे हागणदारीमुक्त होण्यास व लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण होण्यासाठी निर्मलग्राम योजनेचा चांगला उपयोग झाला. परंतु, स्वच्छतेचे काम हे योजनेपुरते मर्यादित नाही. ती सतत चालणारी चळवळ आहे.
- भारत पाटील, स्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय संघटक