Join us

PNB Scam : पीएमएलए कोर्टाकडून PNB बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 12:28 IST

Punjab National Bank Scam : पीएनबीने ज्या २३ जणांच्या नावे ही हमीपत्रे तयार केली होती, त्यातील २१ जण नीरव मोदीच्या थेट संबंधांतील होते.

मुंबई -  पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला आज विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार  पीएमएलए कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. नीरव मोदी यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. 

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती, असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.

बेल्जियममधील प्रख्यात बीडीओ या ऑडिट कंपनीकडे फॉरेन्सिक ऑडिटचे काम सोपविण्यात आले होते. तिने आतापर्यंत ५ अंतरिम व एक अंतिम अहवाल पीएनबीला सोपविला आहे. त्यात या बेकायदा हमीपत्रांचा उल्लेख आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत सुरू असून, तेथील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीचे काम पंजाब नॅशनल बँकेनेच बीडीओ या ऑडिट कंपनीकडे सोपविले होते. त्यात पीएनबीने २८ हजार कोटी मूल्याची १५६१ हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) नीरव मोदीला दिली होती, असे दिसून आले. त्यापैकी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची १,३८१ हमीपत्रे बेकायदेशीर पद्धतीने दिली होती.

पीएनबीने ज्या २३ जणांच्या नावे ही हमीपत्रे तयार केली होती, त्यातील २१ जण नीरव मोदीच्या थेट संबंधांतील होते. त्यातील १९३ हमीपत्रांचा गैरवापर केल्याचे या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले. हा अहवाल अमेरिकेतील इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट या संस्थेने मिळविला आहे. या अहवालामध्ये नीरव मोदीच्या भारतातील २0 मालमत्तांचा उल्लेख आहे, पण यापैकी कोणतीही मालमत्ता कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आली नव्हती, हे विशेष असल्याचं बोललं जातं. 

महागड्या कार्स, बोट व पेटिंग्जबीडीओ कंपनीने आपल्या अहवालात नीरव मोदीकडील १५ महागड्या कार्स, एक बोट, १0६ अत्यंत महाग अशी पेटिंग्ज आदींचा उल्लेख केला आहे. एम. एफ. हुसैन, राजा रवी वर्मा, जामिनी रॉय आदींच्या या कलाकृती आहेत. या सर्वांची किंमत सुमारे २0 कोटी रुपये आहे. 

टॅग्स :नीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळान्यायालय