Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेनडेड मुलाच्या अवयवदानाने नऊ वर्षांच्या मुलीला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:55 IST

यंदाच्या वर्षातील मुंबईतील ४५ वे अवयवदान

मुंबई : विक्रोळी येथील नऊ वर्षीय मुलीवर यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलुंड येथील रुग्णालयातील ही ९८ वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. यंदाच्या वर्षातील मुंबईतील हे ४५ वे अवयवदान आहे. या रुग्णालयात पार पडलेले हे पहिलेच पोस्ट-सिंगल व्हेंट्रिकल रिपेअर हार्ट ट्रान्सप्लांट आहे.आंध्र प्रदेश येथील १७ वर्षीय रुग्णामुळे हे प्रत्यारोपण शक्य झाले. सिटी रुग्णालयामधील रुग्णावर उपचार सुरू होते आणि त्याला ब्रेनडेड घोषित केले. रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी कुटुंबीयांना अवयवदानाची माहिती दिली. त्यानंतर रुग्णाच्या वडिलांनी मुलाचे हृदय, यकृत व मूत्रपिंड दान करण्यास मंजुरी दिली आहे.९ वर्षीय मुलगी ही १४ जून २०१९ पासून हृदय प्रत्यारोपणाची वाट पाहत होती. एक वर्षाची असताना जटिल हृदय दोषासाठी पॅलिएट सर्जरी करण्यात आली होती आणि तिला ५-६ वर्षांची झाल्यानंतर पूर्ण रिपेअर ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही अपरिहार्य स्थितींमुळे ते होऊ शकले नव्हते. तिच्या हृदयाचे आरोग्य अधिक खालावत जात होते आणि ती अंथरुणाला खिळून होती. तिचे हृदय क्षमतेच्या १०-१५ टक्केच काम करत होते. हृदय प्रत्यारोपण हाच तिच्या वाचण्याचा मार्ग होता.रविवारी सकाळी ८.५२ वाजता दाता रुग्णालयातून बाहेर पडत हृदय सकाळी ९.३० वाजता मुलुंड येथील रुग्णालयात पोहोचले. ३८ मिनिटांत २५ किमी अंतर पार करण्यात आले. मुलुंड खासगी रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अन्वय मुळे आणि पेडिएट्रिक कार्डियोथोरॅसिस सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. धनंजय मालणकर यांच्या चमूने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

टॅग्स :अवयव दान