म्हाडाच्या सोडतीसाठी दोन दिवसांत नऊ हजार नोंदणी
By Admin | Updated: April 17, 2015 01:42 IST2015-04-17T01:42:14+5:302015-04-17T01:42:14+5:30
म्हाडाच्या घरांसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन दिवसांत तब्बल ९ हजार २९ जणांनी नावनोंदणी केली.

म्हाडाच्या सोडतीसाठी दोन दिवसांत नऊ हजार नोंदणी
मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन दिवसांत तब्बल ९ हजार २९ जणांनी नावनोंदणी केली. त्यांना आता २१ एप्रिलपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. दरनिश्चितीचा गोंधळ आणि वांद्रे पोटनिवडणुकीमुळे यंदा म्हाडाची लॉटरी जाहिरात रेंगाळली होती. अखेर मतदानानंतर १३ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मुंबईत अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाबरोबर अंध व अपंग प्रवर्गातील आरक्षित ६६ फ्लॅटची सोडतही या वेळी काढली जाईल. अर्जाच्या नावनोंदणीसाठी बुधवार दुपारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरू झाली आहे. गुरुवारी सायंकाळ साडे सातपर्यंत तब्बल २० हजार ३४६ जणांनी पाहणी केली. तर १० हजार ४७० जणांनी नावनोंदणीसाठी माहिती भरली. पैकी ९०२९ जणांचे नाव नोंदवून त्यांना त्याबाबत मोबाइलवर मेसेजद्वारे कळवले. ६९० जणांनी अपुरी व चुकीची माहिती भरल्याने त्यांची विनंती नाकारण्यात आली. (प्रतिनिधी)
वेबसाईटवर लॉटरी - २०१५ हा स्वतंत्र विभाग
या विभागामध्ये रजिस्टरसाठी इच्छुकाने लॉग इन करून त्या फोल्डरमध्ये स्वत:चे नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, फोटो भरणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हाडाकडून २४ तासांमध्ये त्याची तपासणी करून नोंदणी क्रमांक मोबाइलवर कळविण्यात येतो.