मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत नऊ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कार्यालयासाठी दरमहा २५ लाख रुपये भाडे मोजले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची शनिवारीही तक्रारीसाठी गर्दी कायम होती. दरम्यान, टोरेसच्या संस्थापक असलेल्या ओलेना स्टोएनाला ‘वॉन्टेड’ आरोपी जाहीर करण्यात आले आहे.
आरोपींनी टोरेस ब्रँड सुरू करण्यासाठी दादर येथे महिना २५ लाख रुपये भाड्याने जागा घेत आलिशान शोरूम थाटल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागा मालकाकडे केलेला भाडेकरार, भाड्याच्या रकमेच्या व्यवहारसह विविध तपशिलाबाबत चौकशी करत आहेत, तसेच दादरसह विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत लॅपटॉप, हार्डडिस्क, सीसीटीव्ही फुटेज यासारख्या इलेक्ट्रॉनिक ऐवजांसह महत्त्वपूर्ण कागदोपत्री दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत.
टोरेस ब्रँड सुरू करणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची माजी संस्थापक, संचालक ओलेना स्टोएना या युक्रेनी महिलेला पोलिसांनी आरोपी केले आहे. तिच्या राजीनाम्यानंतर व्हिक्टोरिया कोवालेंकोला संस्थापक करण्यात आले होते. त्यांचा शोध सुरू आहे.
आर्थिक कुंडली काढण्यास सुरुवातप्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनीने गुंतवणुकीची रक्कम गोळा करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांसह गुन्ह्यातील रक्कम अन्यत्र वळविण्यासाठी वापरलेल्या खात्यांचा तपशील आर्थिक गुन्हे शाखेने मागविला असून, त्याआधारे नेमकी किती रक्कम, कुठे आणि कशी वळविली? याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
कार स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांची ओळख पटली दादरमधील कंपनीने १५ वाहने विकत घेत आणि अन्य पाच वाहने बूक केल्याचे समोर आले होते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही वाहने बक्षीस म्हणून दिल्याचे समोर येताच, ती स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा शोध सुरू होता. त्यांची ओळख पटल्याचे सांगण्यात आले.