Join us

लोकल वेळेत चालविल्याने गुरुवारी शून्य मृत्यू, १० रेल्वे पोलीस ठाण्यांत शून्य अपघातांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 03:06 IST

दररोज लोकल उशिराने चालविण्यात येत असल्याने एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवाशांची गर्दी होते.

मुंबई  - दररोज लोकल उशिराने चालविण्यात येत असल्याने एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे दररोज मुंबई उपनगरीय लोकल मार्गात दररोज ९ ते १५ प्रवाशांचा मृत्यू होतो. मात्र २६ जून रोजी लोकल वेळेवर चालविल्याने उपनगरीय लोकलमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १७ पैकी १० रेल्वे पोलीस ठाण्यांत शून्य अपघातांची नोंद झाली आहे.रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्तरीत्या गस्तीमुळे एका दिवसात शून्य मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रवाशांना रूळ ओलांडून दिला नाही़ क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यापासून रोखले़ त्याचा परिणाम म्हणून २६ जून रोजी एकाही प्रवाशाचा बळी गेला नाही़मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर, डोंबिवली, कर्जत आणि हार्बर मार्गावरील वडाळा, वाशी, पनवेल आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे, बोरीवली आणि पालघर या १० लोहमार्ग पोलीस ठाण्यांत शून्य अपघातांची नोंद करण्यात आलीआहे.२६ जून रोजी उपनगरीय रेल्वे प्रवासात ११ प्रवासी जखमी झाले. यामध्ये ठाणे स्थानकात २, कुर्ला स्थानकात १, कल्याण स्थानकात ३, चर्चगेट स्थानकात १, अंधेरी स्थानकात १, वसई स्थानकात १, मुंबई सेंट्रल स्थानकात २ प्रवासी जखमी झाले.एक दिवस लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यात आल्याने एकही मृत्यू लोकल प्रवासात झाला नाही. असे दररोज झाल्यास लोकल प्रवास सुरक्षित होईल. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांची संयुक्तरीत्या कामगिरी सुरू आहे. प्रत्यक्षात पोलिसांची गस्त वाढविली आहे. त्यामुळे हे शक्य झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई लोकल