उमेदवार निवडीत नाईकांची कसोटी
By Admin | Updated: February 24, 2015 01:06 IST2015-02-24T01:06:18+5:302015-02-24T01:06:18+5:30
आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्ट करून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.

उमेदवार निवडीत नाईकांची कसोटी
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचे स्पष्ट करून माजी मंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा अशी तिरंगी लढत पाहावयास मिळेल. असे असले तरी मागील दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता व संभ्रमावस्था पाहता उमेदवार निवडताना नाईकांची कसोटी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर नाईक समर्थकांत कमालीची अस्वस्था निर्माण झाली होती. महापालिका निवडणुकीत विधानसभेचाच ट्रेंड कायम राहिला तर आपले काही खरे नाही, या भीतीने आजी-माजी नगरसेवकांची झोप उडाली होती. यातच नाईक भाजपा किंवा शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याच्या वावड्या उठल्या. त्यामुळे तळ्यात-मळ्यातील पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली. नाईक यांनी पक्षांतराच्या प्रश्नावर दीड-दोन महिने मौन बाळगल्याने स्वपक्षातील कार्यकर्त्यांसह शिवसेना व भाजपाच्या गोटातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. निर्माण झालेल्या या राजकीय अनिश्चिततेवर नाईक यांनी आज पडदा पाडला. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर केल्याने पक्षातील निष्ठावंतांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र नाईक यांनी भूमिका मांडण्यास विलंब केल्याने महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची निवड करताना त्यांना कसरत करावी लागणार आहे.
राजकीय अनिश्चिततेवर पडदा पडला असला तरी प्रभाग रचना आणि आरक्षणामुळे अनेकांची निवडणुकीअगोदरच दांडी गूल झाली आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज आजी -माजी नगरसेवकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पत्नी, मुलगी किंवा सुनेला उमेदवारी मिळावी, यादृष्टीने अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रभाग रचनेतील बदलामुळे अनेक भागात पूर्वीच्या प्रभागाचे विभाजन झाले . तर शेजारच्या दोन - तीन प्रभागांची सरमिसळ करण्यात आली. त्यामुळे कोणत्या प्रभागातून उमेदवारी मागायची, असा संभ्रम इच्छुकांच्या मनात आहे. परिणामी एका एका प्रभागातून चार ते पाच असे प्रबळ दावेदार आहेत. इच्छुकांच्या या भाऊगर्दीतीतील एकाला उमेदवारी देऊन, इतरांची समजूत काढून संभाव्य बंडखोरी मोडीत काढण्याचे आव्हान नाईक यांच्यासमोर असणार आहे.