नाइटलाइफमुळे तरुणांमध्ये वाढू शकतो हृदयविकार
By Admin | Updated: February 24, 2015 01:09 IST2015-02-24T01:09:05+5:302015-02-24T01:09:05+5:30
दिवसभर कामाचे टेन्शन, अनिश्चित कामाचे तास, वेळेवर जेवण घेत नसल्यामुळे आधीच तरुणांची जीवनशैली आरोग्यास घातक ठरत आहे.

नाइटलाइफमुळे तरुणांमध्ये वाढू शकतो हृदयविकार
पूजा दामले, मुंबई
दिवसभर कामाचे टेन्शन, अनिश्चित कामाचे तास, वेळेवर जेवण घेत नसल्यामुळे आधीच तरुणांची जीवनशैली आरोग्यास घातक ठरत आहे. या सगळ्यात मुंबईत नाइटलाइफ सुरू झाल्यास त्याचा विपरीत परिणाम तरुणाईच्या हृदयावर होऊ शकतो. सोशल नेटवर्किंग साइट्स, चॅटिंग, काम अशा कारणांमुळे आधीच तरुणाई अपुरी झोप घेत आहे. झोपेचे तास कमी झाल्यास त्याचा हृदयावर परिणाम होतो. प्रत्येकाने ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे मत हृदयरोगतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.
अनेक मुंबईकर हे घड्याळाच्या काट्यावरच धावत असतात. त्यातून काही क्षण विश्रांती मिळावी, यासाठी नवनवीन पर्याय नेहमीच शोधतात. आता नाइटलाइफचा प्रस्ताव मान्य झाल्यास रात्रभर शहर जागे राहणार हे अटळ आहे. नाइटलाइफमध्ये तरुणाई रात्ररात्र घराबाहेर राहण्याचा धोका आहे. आपल्या शरीराचे एक घड्याळ असते. शरीराचा दिनक्रम या घड्याळानुसार चालतो. यामध्ये बदल झाल्यावर त्याचा परिणाम आरोग्यावर होणे अपरिहार्य ठरते. चार ते पाच तासच झोप घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हृदयावर याचा परिणाम होताना दिसतो. एकूणच जीवनशैलीमुळे तरुण वयातच मधुमेह, रक्तदाब असे आजार जडत आहेत. आता याचबरोबरीने नाइटलाइफ वाढल्यास हृदयविकाराचा धोकादेखील बळावणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
झोप शरीराचा एकतृतीयांश भाग व्यापते. झोपेमुळे शरीराचे कार्य योग्यप्रकारे होण्यास मदत होऊन शरीराचे संतुलन राखले जाते. पण सध्याच्या जीवनशैलीत तरुणवर्गाची झोप ४ ते ५ तासांवर आलेली आहे. व्यावसायिक यश मिळवण्यासाठी ही उठाठेव सुरू असते. यश मिळाल्यावर सेलीब्रेशन होते. त्यात झोपेचे तास अजून कमी होऊन काही वेळा ते तीन-चार तासांवर येते. त्यातून निद्रानाशाचा आजार जडतो. निद्रानाशाचा थेट संबंध हा हृदयविकार आणि रक्तदाबाशी आहे. सातत्याने असेच होत राहिल्यास याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी मांडले. मानवी शरीराला सात तासांची झोप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.