‘नायटिंगेल्स’ना हवे आरोग्य कवच

By Admin | Updated: May 12, 2015 04:33 IST2015-05-12T04:33:33+5:302015-05-12T04:33:33+5:30

स्वाइन फ्लू, टीबी, कुष्ठरोग, अतिसार, कांजण्यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची शुश्रूषा परिचारिका करत असतात

'Nightingale' needs health cover | ‘नायटिंगेल्स’ना हवे आरोग्य कवच

‘नायटिंगेल्स’ना हवे आरोग्य कवच

पूजा दामले, मुंबई
स्वाइन फ्लू, टीबी, कुष्ठरोग, अतिसार, कांजण्यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची शुश्रूषा परिचारिका करत असतात. दररोज काही तास सतत रुग्णांच्या सान्निध्यात राहिल्याने परिचारिकांना संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचा धोका अधिक असतो. पण यापासून परिचारिकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही, विमा योजनेतही त्यांना संसर्गजन्य आजाराचे संरक्षण मिळत नाही.
परिचारिकांची संख्या कमी असल्याने एका परिचारिकेला अनेकदा दोन ड्युटी कराव्या लागतात. प्रत्येक रुग्णाची योग्य ती काळजी घेणे हे परिचारिकेचे कर्तव्य असते. परिचारिकेकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यास रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे नेहमीच परिचारिकांना सतर्क राहून काम करावे लागते. परिचारिका रुग्णसेवा करत असताना मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
नवनवीन संसर्गजन्य आजार येत आहेत. परिचारिकांना या रुग्णांची काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. त्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यास याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोणाकडेही नाही. परिचारिका आजारी पडल्यास त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरदेखील होतो. काही परिचारिकांचे आर्थिक प्रश्न असतात. यामुळेच आरोग्य विम्यात संसर्गजन्य आजारांचा समावेश करावा, अशी मागणी परिचारिका करत आहेत.
परिचारिकांवर सतत कामाचा आणि वरिष्ठांचा ताण असतो. दीर्घकाळ अतिताणाखाली राहिल्याने बहुतांश परिचारिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास त्यांना इतर आजार होण्याचा धोका वाढतो. परिचारिकांवर शारीरिक ताणाच्या बरोबरीनेच मानसिक ताणदेखील असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असतो. ड्यूटी सुरू झाल्या झाल्या परिचारिकांना अरेरावीला सामोरे जावे लागते. यामुळे परिचारिकांना मानसिक ताण असतो. परिचारिकांवरचा मानसिक ताण कमी होण्याची आवश्यकता आहे. कित्येक वर्षे सतत उभे राहून काम केल्याने परिचारिकांना वृद्धापकाळात सांधेदुखीचा त्रास उद्भवल्याचे आठवले यांनी सांगितले.

Web Title: 'Nightingale' needs health cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.