रात्रीचा प्रचारच जोखणार उमेदवारांचे बळ!
By Admin | Updated: April 20, 2015 22:39 IST2015-04-20T22:39:13+5:302015-04-20T22:39:13+5:30
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारातील जाहीर प्रचार सोमवारी संपत असला तरी ‘रात्रीचा प्रचार’ उमेदवारांची खरी ताकद जोखणार आहे

रात्रीचा प्रचारच जोखणार उमेदवारांचे बळ!
अंबरनाथ : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारातील जाहीर प्रचार सोमवारी संपत असला तरी ‘रात्रीचा प्रचार’ उमेदवारांची खरी ताकद जोखणार आहे. सर्वच पक्षांना हे समीकरण माहीत असले तरी कोण किती व कसा संपर्क साधणार, यावरच ‘किसमे कितना है दम’ ठरणार आहे. शिस्त आणि नियोजनाच्या बाबतीत शिवसेना व भाजपा हे पक्ष आघाडीवर असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष उमेदवारांमार्फतच प्रभागात अंतर्गत प्रचारात व्यस्त झाले आहेत. शिवसेनेची कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असून रात्री १२ नंतरही शिवसेनेचे नेते आपल्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
निवडणुकीचा प्रचार आणि सभेच्या नियोजनाचे गणित तयार करण्यात शिवसेनेने चांगली पकड घेतली आहे. सेनेने जाहीर सभेला प्राधान्य न देता रॅलीवर भर देऊन सर्व प्रभागांत प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक नेते आणि जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या चौक सभेच्या वेळा निश्चित करून त्या ठरलेल्या वेळेत करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. उमेदवारांच्या प्रचारात खंड न पाडता त्यांना प्रचारात मदत करण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी शहरात आलेले आहेत. भाजपा यंदा प्रथमच नियोजनासह मैदानात उतरली आहे. त्यांनीदेखील प्रभावी नेत्यांची सभा घेऊन मतदारांपुढे वातावरणनिर्मिती करून मतदारांना साद घातली आहे.
उमेदवारांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील काही पक्ष पदाधिकारी मैदानात उतरले असून त्यांच्या मदतीने उमेदवार प्रचार आघाडी घेत आहेत. भाजपा पथनाट्याद्वारे शिवसेनेच्या कार्यकाळातील अपयशांची मालिका सर्वांपुढे प्रभावीपणे मांडत आहे. जिल्हाप्रमुख नरेंद्र पवार, शिवाजी आव्हाड आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे संपूर्ण प्रचाराची जबाबदारी आहे. राष्ट्रवादीने प्रभागनिहाय प्रचारात लक्ष दिले असून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. जितेंद्र आव्हाड वगळता कोणताच मोठा नेता प्रचारात आलेला नाही. स्थानिक पातळीचे नेतेच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. त्यातच माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ आणि गुलाबराव करंजुले हेच चौक सभा घेऊन पक्षाला तारण्याचा प्रयत्न करत आहेत. (प्रतिनिधी)