पोलिसांच्या रडारवर नायजेरियन
By Admin | Updated: March 24, 2015 00:05 IST2015-03-24T00:05:21+5:302015-03-24T00:05:21+5:30
शहरात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. बेकायदा राहणारे नायजेरियन्स आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पोलिसांच्या रडारवर नायजेरियन
नवी मुंबई : शहरात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. बेकायदा राहणारे नायजेरियन्स आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. घर भाडेतत्त्वावर घेऊन गटागटाने राहणाऱ्या या नायजेरियनांची झाडाझडती घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. तसेच पोलीस परवानगी न घेता या नायजेरियन नागरिकांना घरे भाड्याने देणारे घर मालक आणि दलालांवरही कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
शहरातील स्वस्त घरांचे डेस्टिनेशन म्हणून गाव-गावठाणातील अनधिकृत इमारतींकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतीच्या पावतीच्या आधारे जुन्या चाळी तोडून त्या ठिकाणी फिफ्टी-फिफ्टी तत्त्वावर रातोरात इमले उभारण्यात आले. विकासकांनी आपल्या हिश्श्याची घरे विकून पोबारा केला आहे, तर संबंधित ग्रामस्थांनी आपल्या वाटणीला आलेली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. विशेष म्हणजे भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. तरीही गाव व गावठाण परिसरात या नियमाला हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे. तीन-चार नायजेरियन लोक एकत्रित येऊन भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याकडून मागेल तेवढे घरभाडे मिळत असल्याने सदनिकाधारक नियमाला बगल देऊन भाडेकरू म्हणून त्यांना ठेवून घेतात. सदनिकाधारकांच्या याच मानसिकतेमुळे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: बोनकोडे, जुईनगर, कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ या गावांत या नायजेरियन नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.
अमली पदार्थांची तस्करी आणि लुटमारीच्या गुन्ह्यात अनेकदा या नायजेरियन टोळ्यांचा सहभाग दिसून आला आहे. त्यामुळे शहरी भागात या लोकांना सहसा कोणी घर भाडेतत्त्वावर देत नाही. परंतु गाव व गावठाण परिसरात उभारलेल्या बेकायदा इमारती व चाळीतून त्यांना आधार मिळतो. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यंतरी धडक मोहीम उघडली होती. शंभरपेक्षा अधिक नायजेरियन्सची चौकशी करण्यात आली. मात्र नंतर ही मोहीम थंडावली . त्यामुळे नायजेरियन नागरिकांच्या विरोधातील वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. (प्रतिनिधी)
घर भाडेतत्त्वावर देताना पोलीस परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु अनेक घरमालक अधिक भाड्याच्या लालसेपोटी या नियमाला बगल देत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नायजेरियन नागरिकांबरोबरच आता घरमालक आणि एजंट यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सध्या शहरात राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांची अधूनमधून चौकशी केली जाते. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांनी दिली.