प्रवाशांना पुढील वर्षी ‘दिवाळी गिफ्ट’
By Admin | Updated: November 16, 2015 02:36 IST2015-11-16T02:36:49+5:302015-11-16T02:36:49+5:30
उपनगरीय रेल्वे प्रवाशांना पुढील वर्षी (वर्ष २0१६) चांगलीच ‘दिवाळी गिफ्ट’ मिळणार आहे. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागतानाच प्रवाशांना नवीन चांगल्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

प्रवाशांना पुढील वर्षी ‘दिवाळी गिफ्ट’
सुशांत मोरे, मुंबई
उपनगरीय रेल्वे प्रवाशांना पुढील वर्षी (वर्ष २0१६) चांगलीच ‘दिवाळी गिफ्ट’ मिळणार आहे. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागतानाच प्रवाशांना नवीन चांगल्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. यामध्ये एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावण्यासह हार्बरवर बारा डबा लोकलसारखा प्रकल्प मार्गी लागेल. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामालाही गती येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मिळून ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून गेल्या काही वर्षांत प्रकल्प आणि सुविधांचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्यांना वेळेत पूर्णविराम देता आला नाही. आता मात्र काही प्रकल्प आणि सुविधा पुढील वर्षापर्यंत पूर्ण होऊन प्रवाशांना त्यांचा चांगलाच फायदा मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यात हार्बरवासीय आणि पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या प्रकल्पांचा तसेच सुविधांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत एसी लोकल (वातानुकूलित) दाखल होणार आहे. ही लोकल दाखल होताच तिची चाचणी घेण्यात येईल आणि चाचणीनंतर ती एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. एसी लोकलबरोबरच पुढील वर्षीच्या दिवाळीपर्यंत सर्व नव्या बम्बार्डियर लोकलही दाखल होतील. हार्बरवासीयांना तर २0१६मध्ये सर्वांत मोठा दिलासा मिळेल. हार्बर मार्गावर अजूनही नऊ डबा लोकल धावत असून, बारा डबा लोकल धावण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांनंतर बारा डबा लोकल धावण्यास सुरुवात होईल. तर डीसी-एसी परावर्तनाचा प्रकल्पही मार्च २0१६पर्यंत मार्गी लागणार असून, त्यामुळे नवीन लोकल हार्बरवासीयांना मिळणे शक्य होणार आहे. अंधेरीपासून गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार, सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही असणाऱ्या लोकलचीही संख्या वाढवण्यात येणार आहे.
गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार
पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या हार्बर रेल्वेचा विस्तार गोरेगावरपर्यंत करण्यात येणार आहे. हा विस्तार मे २0१५पर्यंत करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा विस्तार होण्यासाठी पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंतचा मुहूर्त देण्यात आला आहे. यादरम्यान ओशिवरा हे नवीन स्थानकही बांधण्यात येत असून, विस्तार पूर्ण झाल्यानंतरच ते प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. प्रकल्पाची एकूण किंमत १४८ कोटी रुपये असून, ओशिवरा स्थानकाचा खर्च ३0 कोटी रुपये आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनाही जोगेश्वरीनंतर ओशिवरा स्थानक मिळेल.
१२ एसी लोकलपैकी पहिली लोकल जानेवारीत?
१२ एसी लोकल मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. यातील पहिली लोकल जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात दाखल होईल. या लोकलला आतापर्यंत सहा ते सात वेळा मुहूर्त देण्यात आला होता. शेवटचा मुहूर्त आॅक्टोबर महिन्याचा देण्यात आला. पण हादेखील मुहूर्त टळल्यावर पुढील वर्षीचा मुहूर्त देण्यात आला. लांब पल्ल्याच्या अन्य गाड्यांप्रमाणेच या लोकलच्या अन्य डब्यांतही जाता येईल, अशी व्यवस्था असेल. या एसी लोकलचे भाडे मात्र सध्या मुंबईत धावणाऱ्या लोकलपेक्षा जास्त असेल, अशी माहिती देण्यात आली.
हार्बरवर बारा डबा लोकल
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनप्रमाणेच हार्बरवर बारा डबा लोकलही पुढील वर्षीच्या मार्चपासून धावण्यास सुरुवात होईल. यासाठी ११५ डब्यांची गरज आहे. ती गरज पूर्ण होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या हार्बरवर नऊ डब्यांच्या ३६ लोकल धावत असून, त्यांच्या ५८३ फेऱ्या होत आहेत. बारा डबा लोकलमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढेल.
१00 महिला डब्यांत सीसीटीव्ही
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही मार्गांवरील १00 महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल २ आॅक्टोबरपासून सेवेत तर सध्या पश्चिम रेल्वेवर सीसीटीव्ही असणाऱ्या तीन लोकल सेवेत दाखल झाल्या आहेत.
हार्बर मार्गावर परिवर्तन
पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परावर्तनाचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर आता हार्बर मार्गावरील परिवर्तनाचे काम पूर्ण करण्यावर रेल्वेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हार्बरवरील डीसी ते एसी परावर्तनाचे काम मार्च २0१६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.