Join us  

पुढील तीन महिन्यांत १ हजार वाहनांचा ताफा मालवाहतूकीस सज्ज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 6:19 PM

पार्सल वाहतुकीमध्ये प्रवेश करण्यास विचारधीन 

कुलदीप घायवट 

मुंबई : आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूकीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन काळात एसटीला मालवाहतुकीतून नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे एसटीच्या ट्रकची संख्या वाढविण्याची मोहीम एसटीने हाती घेतली आहे. यातून पुढील तीन महिन्यांत १ हजार वाहनांचा ताफा मालवाहतुकीस सज्ज करण्याचा एसटीचा मानस आहे. यासह एसटी महामंडळ मालवाहतुकीनंतर पार्सल वाहतुकीमध्ये प्रवेश करण्यासाठी विचारधीन आहे. 

मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने एसटीचे उत्पन्न आणखीन घटले. मात्र एसटीची मालवाहतूक सुरु झाल्याने आर्थिक गणित सांभाळण्यास मदत होत आहे. एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी ट्रकची संख्या वाढविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. एसटीने ६०५ प्रवासी वाहनांच्या रूपांतरणासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तर, ३८० वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतरण करण्याचे काम सुरु केले आहे. मालवाहतुकीच्या व्यवसायात महामंडळ सध्या पूर्ण ट्रक लोड वाहतूक करीत आहे. मात्र या व्यवसायात पार्ट लोड, पार्सलच्या वाहतुकीची प्रचंड मागणी आहे. या वाहतुकीत जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यामुळे महामंडळ मालवाहतुकीच्या अनुभवाच्या आधारे पार्सल वाहतुकीसाठी प्रयत्न करत आहेत. 

-----------------

मागील दोन महिन्यात ३.१५ कोटी उत्पन्न  : २० मे ते २० जुलै या दोन महिन्यात एसटीच्या मालवाहतुकीच्या गाड्याची एकूण ६ हजार ५१२ फेऱ्या झाल्या आहेत. या मालवाहतुकीत एसटीला ३ कोटी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. महामंडळाला दररोज सरासरी ५ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. ऑगस्ट २०२० पर्यंत हे उत्पन्न दररोज २५ लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. तर, येणाऱ्या वर्षात १ हजार वाहनांच्या द्वारे मालवाहतुकीतून दररोज १ हजार कोटी उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. 

--------------

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पर्यंत मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. या योजनेंतर्गत सुमारे १ हजार टन धान्याची वाहतूक केली जाते. रायगड विभागाने जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून मालवाहतूक केली आहे. भंडारा, रत्नागिरी विभाग वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रोपांची वाहतूक करत आहे. राज्यातील प्रत्येक विभागाने अशाप्रकारच्या नव्या कल्पना राबवून मालवाहतुकीस चालना देण्याच्या सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत. 

-----------------------

एसटी महामंडळाच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवाहतुकीच्या वाहनांची ज्याप्रमाणे मागणी वाढत जाईल, त्याप्रमाणे वाहनांत वाढ करण्यात येणार आहे. एसटी महामंडळ पार्सल वाहतुकीसाठी विचारधीन आहे. 

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

 

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई