Join us  

चारित्र्यावरील संशयातून नवजात बाळाला सोडले रिक्षात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 1:51 AM

पदरात एक मुलगा असताना दुसरा मुलगा झाला. त्यात चारित्र्यावरील संशयामुळे ‘तो’ मुलगा आपला नाही, म्हणून पित्याने आधीच जबाबदारी झटकली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पदरात एक मुलगा असताना दुसरा मुलगा झाला. त्यात चारित्र्यावरील संशयामुळे ‘तो’ मुलगा आपला नाही, म्हणून पित्याने आधीच जबाबदारी झटकली. नऊ महिने गर्भात सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याच्या वाट्याला उपेक्षितांचे जीवन येऊ नये, म्हणून काळजावर दगड ठेवून आईने बाळाला रिक्षात सोडून घर गाठले. मात्र, सुदैवाने ते बाळ पोलिसांच्या हाती लागले. तुटपुंज्या माहितीच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी १२ तासांच्या आता पालकांचा शोध घेत बाळाला त्यांच्या स्वाधीन केले.वर्सोवात पार्क केलेल्या रिक्षांतून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास बाळाचा आवाज येत असल्याचे दुचाकीस्वाराच्या लक्षात आले. त्याने शोध घेतला, तेव्हा एका रिक्षाच्या मागच्या सीटमध्ये बाळ सापडले. जवळपास कोणीही नसल्याने, त्याने पोलिसांना बोलावले.तपास अधिकारी अविनाश जाधव, गणपत पडवळ, पोलीस अंमलदार सुधा सावंत, पाडवी हे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला रुग्णालयांत आठवड्याभरात जन्म घेतलेल्या बाळांचा शोध सुरू झाला. त्यात एका रुग्णालयात मंजू सावंत या महिलेने बाळाला जन्म दिल्याची माहिती मिळाली.तिच्या नावापुढे फक्त वर्सोवा शीवलेन एवढीच माहिती होती. बाळाला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांनी शीवलेन हा परिसर अक्षरक्ष: पिंजून काढला. दरम्यान, दुर्गा सावंतची पत्नी गरोदर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांचे घर गाठले. तेथे त्याची पत्नी मंजू होती. तिच्याकडे बाळाबाबत विचारणा करताच, तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली, तेव्हा तिने हंबरडा फोडला.पदरात चार वर्षांचा मुलगा आहे, त्यात गरिबीमुळे परिस्थिती वाईट होती. तसेच पतीनेही चारित्र्यावरील संशयातून बाळाला नाकारले. पुढेही तो बाळाला तुच्छ वागणूक देईल ही भिती होतीच. म्हणून मग त्यापेक्षा मुलगा असल्याने त्याचा चांगल्या घरात सांभाळ होईल, या भावनेने रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बाळाला रिक्षाच्या मागच्या सीटमागील रिकाम्या जागेत ठेवून घर गाठल्याची कबुली मंजूने पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचेही समुपदेशन केले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले....आणि बाळ पुन्हा कुशीत आलेसध्या बाळ कुठे आहे, असा प्रश्न पोलिसांनी सावंतला विचारला, तेव्हा तो आता खूप लांब गेला आहे. त्याला कोणीतरी रिक्षातून उचलून नेल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी बाळ रुग्णालयात असल्याचे सांगून तिला तेथे नेले. तेथे बाळाला कुशीत घेताच, तिला अश्रू अनावर झाले. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी