न्यूयॉर्कला जाणार गोधडी
By Admin | Updated: February 4, 2015 01:10 IST2015-02-04T01:10:50+5:302015-02-04T01:10:50+5:30
आई-आजीच्या जुन्या साड्यांपासून तयार होणाऱ्या अन् मायेची ऊब देणाऱ्या गोधड्या बदलत्या फ्लॅट संस्कृतीत हळूहळू काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

न्यूयॉर्कला जाणार गोधडी
मुंबई : आई-आजीच्या जुन्या साड्यांपासून तयार होणाऱ्या अन् मायेची ऊब देणाऱ्या गोधड्या बदलत्या फ्लॅट संस्कृतीत हळूहळू काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. बघता बघता त्यांची जागा ‘ब्लँकेट’ने घेतली; मात्र पिढ्यान्पिढ्या चालत आलेला वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांपैकी गीता खंडेलवाल यांनी महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या गोधड्यांचे अनोखे प्रदर्शन आयोजित केले आहे. या गोधड्यांचे प्रदर्शन पुढील टप्प्यात सातासमुद्रापार न्यूयॉर्क आणि योकोहामा येथे आयोजित केले जाणार आहे.
गुजरात, राजस्थान या राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील कारागिरी वेगळी आहे. आपल्या पारंपरिक वारशातून आलेली गोधडी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती खंडेलवाल यांनी ‘लोकमत’ला दिली. गेली चारहून अधिक दशके गीता स्वत: गोधड्या शिवत असून डिझाइन्स, रंगसंगती यांवर प्रयोगही करतात.
प्रदर्शनात लोणावळा, वाई, पुणे, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, कोकण, चिपळूण, नागपूर, महाराष्ट्राचा सीमाभाग आणि कर्नाटक अशा ठिकाणच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी नटलेल्या गोधड्यांचा समावेश आहे. प्रदर्शनात एथनिक टच दिलेल्या काही गोधड्या आहेत, या गोधड्यांचा लिलाव करण्यात येणार असून येणारा निधी ग्रामीण भागातील कर्करोग असणाऱ्या गोधडी कलाकारांना देण्यात येईल. शिवाय, कलाप्रेमींना त्यांच्या आवडीप्रमाणे गोधडी शिवायची संधी मिळणार आहे.
हे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी दालनात आयोजित केले असून ६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते ५ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. (प्रतिनिधी)