मुंबईतील बिल्डरांवर नव्या वर्षाआधीच संक्रांत
By Admin | Updated: December 24, 2014 01:05 IST2014-12-24T01:05:08+5:302014-12-24T01:05:08+5:30
मुंबईतील बिल्डर्स, आर्किटेक्ट, महापालिका प्रशासन व सह जिल्हा निबंधकांना एकूण चार प्रकरणांत ठपका ठेवत १६ नोटिसा

मुंबईतील बिल्डरांवर नव्या वर्षाआधीच संक्रांत
मुंबई : मुंबईतील बिल्डर्स, आर्किटेक्ट, महापालिका प्रशासन व सह जिल्हा निबंधकांना एकूण चार प्रकरणांत ठपका ठेवत १६ नोटिसा धाडल्यानंतरही मुंबईसह राज्यातील बिल्डर्स चटईक्षेत्र मोजण्याच्या मापाचे प्रमाणीकरण करण्याबाबत गंभीर दिसत नसल्याचा निष्कर्ष वैध मापनशास्त्र विभागाने काढला आहे.
त्यामुळे आता तीव्र कारवाई करीत मुंबईतील किमान ५० बिल्डर्सना कारवाईच्या नोटिसा धाडणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. परिणामी नव्या वर्षाआधीच मुंबईसह राज्यातील बिल्डर्सवर संक्रांत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यासंदर्भात विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांना विचारणा केली असता, प्रमाणीकरण न केलेल्या बिल्डर्सवर कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंगळवारी बिल्डर्स संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द करण्यात आली. याआधीच प्रशासनाने चार प्रकरणांत
संबंधित बिल्डर्स, पालिका अधिकारी, सह जिल्हा निबंधक आणि आर्किटेक्ट यांना एकूण १६ नोटिसा धाडल्या आहेत.
मात्र कोणत्याही बिल्डर्स किंवा संघटनेने या नियमाबाबत किंवा कारवाईबाबत तक्रार केलेली नाही.
कारवाईला सुरुवात
केल्यानंतरही चर्चेसाठी कोणतीही संघटना पुढे आली नसल्याने कोणत्याही बिल्डर संघटनेची कारवाईला हरकत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे आता नोटीस बजावल्यानंतर खुद्द प्रशासनच तक्रारदार म्हणून संबंधित बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे.