रुग्णालयांचे उद्घाटन नव वर्षात

By Admin | Updated: December 29, 2014 02:37 IST2014-12-29T02:37:45+5:302014-12-29T02:37:45+5:30

चार वर्षे धीम्या गतीने सुरू असलेले पालिकेच्या तीन रुग्णालयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रुग्णालयीन उपकरणे बसविणे व कर्मचारी नियुक्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

In the new year in the inauguration of the hospitals | रुग्णालयांचे उद्घाटन नव वर्षात

रुग्णालयांचे उद्घाटन नव वर्षात

नवी मुंबई : चार वर्षे धीम्या गतीने सुरू असलेले पालिकेच्या तीन रुग्णालयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रुग्णालयीन उपकरणे बसविणे व कर्मचारी नियुक्त करण्याचे काम सुरू झाले आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ऐरोली व नेरूळमधील माता बाल रुग्णालयाची जुनी इमारत तोडून प्रत्येक १०० बेडचे रुग्णालय बांधण्याचे काम चार वर्षांपूर्वी सुरू केले आहे. बेलापूरमध्ये जिल्हापरिषदेच्या जुन्या आरोग्य केंद्राच्या जागेवर ५० बेडचे माताबाल रुग्णालय बांधण्याचे कामही त्याचदरम्यान सुरू करण्यात आले होते. वास्तविक दोन वर्षात रुग्णालयांचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध कारणांनी रुग्णालयाचे काम रखडत गेले. बांधकाम पूर्ण होण्यास चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. यामुळे अद्याप रुग्णालये सुरू करण्यात आलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रखडलेल्या कामांवरून टीका होवू लागल्यामुळे तीनही रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आलेला आहे.
रुग्णालयांचे काम रखडल्यामुळे शहरामधील रुग्णांची गैरसोय होवू लागली आहे. ऐरोलीमध्ये महाजन रुग्णालयामध्ये माताबाल रुग्णालय सुरू आहे, परंतु तेथील जागा अपुरी पडत आहे. नेरूळमधील रुग्णांना डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागत आहे. यामुळे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय व कोपरखैरणे, तुर्भेमधील माताबाल रुग्णालयांवरील ताण वाढत आहे. रुग्णांची गैरसोय कमी करण्यासाठी तीनही रुग्णालये लवकर सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी रुग्णालये सुरू झाली नाहीत तर त्याचे पडसाद निवडणूक प्रचारामध्ये उमटण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी तीनही रुग्णालये सुरू करावी लागणार आहेत. चारवर्षे धीम्या गतीने काम करणाऱ्या पालिका प्रशासनाने ही आता रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. रुग्णालयीन उपकरणे बसविण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. डॉक्टर व इतर कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नवीन वर्षात कोणत्याही स्थितीमध्ये रुग्णालये सुरू झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता कामांमध्ये दिरंगाई झाली व वेळेत लोकार्पण झाले नाही तर त्याचा फटका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन सर्वांचीच धावपळ सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the new year in the inauguration of the hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.