नवे वेळापत्रक जुलैमध्ये

By Admin | Updated: May 27, 2014 05:26 IST2014-05-27T05:26:04+5:302014-05-27T05:26:04+5:30

कॅनेडीयन कंपनीने तयार केलेल्या शेड्युलमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्ट प्रशासनाने चर्चा करत काही सुधारणा केल्या आहेत.

New schedule in July | नवे वेळापत्रक जुलैमध्ये

नवे वेळापत्रक जुलैमध्ये

मुंबई : कॅनेडीयन कंपनीने तयार केलेल्या शेड्युलमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्ट प्रशासनाने चर्चा करत काही सुधारणा केल्या आहेत. हे सुधारित ड्युटी शेड्युल १ जूनपासून केवळ महिनाभरासाठी १२ डेपोंमध्ये लागू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट वर्कर्स युनियनने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या तात्पुरत्या शेड्युलबाबत जून महिन्यात युनियन प्रशासनासोबत चर्चा करून काही बदल घडवणार आहे. त्यानंतर नवे शेड्युल तयार करून ते मुंबईतील २६ डेपोंमध्ये १ जुलैपासून लागू करणार असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे सचिव शरद राव यांनी सांगितले. या वेळी राव म्हणाले, २३ मे रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाने काही सुधारणा करण्याचे मान्य केले. त्यात १ जून रोजी सुरू होणार्‍या ड्युटी शेड्युलमधील १० तासांच्या स्प्रेड ओव्हर असलेल्या ड्युट्यांमध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे. पूर्वीच्या शेड्युलप्रमाणे १० तासांच्या ४८५ स्प्रेड ओव्हर ड्युटीज होत्या. आता त्या २९४ करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले. शिवाय शेड्युलमधील एका ड्युटीमध्ये अनेक बसमार्ग देण्याच्या बाबीलाही चालकांनी विरोध केला होता. त्यात बदल करून सुमारे ४४ टक्के ड्युट्यांना एकच बसमार्ग देण्यात आला आहे. म्हणजेच एकूण २ हजार ७३ ड्युटीजला एकच बसमार्ग देण्यात आला आहे. या ड्युटी प्रथम निवड पद्धतीने तर नंतर वयोमर्यादेनुसार देण्यात येणार असल्याचे राव म्हणाले. सुधारित शेड्युलमध्ये जास्तीतजास्त कर्मचार्‍यांना पूर्ण आठवड्यामध्ये दोनपेक्षा जास्त बसमार्गावर काम करावे लागू नये, अशी सुधारणा केल्याचे युनियनचे अध्यक्ष उदयकुमार आंबोणकर यांनी सांगितले. आंबोणकर म्हणाले, किमान आठवडाभर एकसारखेच काम देण्याची मागणी युनियनने केली होती. ती प्रशासनाने मान्य केली आहे. मात्र चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांची अवस्था खूपच बिकट आहे. तसा एक अहवाल युनियनने नेमलेल्या समितीने प्रशासनास सादर केला आहे. त्यामुळे जून महिन्यात बिकट अवस्थेत असलेली विश्रामगृहे, उपाहारगृहे आणि चौक्या दुरुस्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे आंबोणकर यांनी सांगितले.

Web Title: New schedule in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.