मुंबई - मुंबई विद्यापीठातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईचा हातभार लागणार आहे. एनईपीअंतर्गत ‘अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन’द्वारे (एएनआरएफ) सुरू केलेल्या ‘पार्टनरशिप्स फॉर एक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च’ उपक्रमात मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील निवडक सात ‘हब’ संस्थांमध्ये आयआयटी मुंबईची निवड झाली असून, या संस्थेशी संलग्न असलेल्या ‘स्पोक’ संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश केला आहे. त्यातून मुंबई विद्यापीठ संशोधन आणि नवोन्मेषाच्या एका नवीन पर्वात प्रवेश करणार असून, अनेक उद्योन्मुख क्षेत्रातील संशोधनाची नव-नवीन दालने खुली होणार आहेत.
या भागीदारीमुळे मुंबई विद्यापीठाला आयआयटी मुंबईसारख्या उच्चस्तरीय संस्थेच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ मिळून विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधकांना ज्ञानाचा आणि कौशल्याचा विकास साधता येईल. प्राध्यापक आणि संशोधकांना ‘इंडस्ट्री ४.०’, ‘ॲडव्हान्स मटेरियल्स’, आणि ‘ग्रीन एनर्जी व सस्टेनेबिलिटी’ यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये आयआयटीतील तज्ज्ञांबरोबर संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या नेटवर्कसाठी पुढील पाच वर्षांसाठी केंद्राकडून १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे प्रमुख अन्वेषक म्हणून विद्यापीठातील रिसर्च डेव्हलपमेंट सेलचे संचालक प्रा. फारुख काझी या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहेत. तर आयआयटी मुंबईतर्फे प्रा. व्ही. एम. गद्रे हे नेतृत्व करणार आहेत. आयआयटी मुंबईच्या ‘हब’मध्ये मुंबई विद्यापीठासह अन्य सात संस्थांचीही ‘स्पोक’ म्हणून निवड झाली आहे. या अनुदानामुळे विद्यापीठाला कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सिक्युरिटी, सेमी कंडक्टर टेक्नोलॉजी आणि नॅनो टेक्नोलॉजी अशा उद्योन्मुख आणि प्रगत क्षेत्रामध्ये ठसा उमटविण्याची संधी मिळेल, असे विद्यापीठाच्या रिसर्च डेव्हलपमेंट सेलचे संचालक प्रा. फारूख काझी यांनी सांगितले.
नेमका काय फायदा होणार? दोन मोठ्या संस्था एकत्र आल्यामुळे संशोधनाच्या नवीन संधी निर्माण होण्यासह विविध विषयांवरील तज्ज्ञांचे सहकार्य मिळेल.विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या संशोधनात सहभागी होण्याची आणि प्रख्यात प्राध्यापकांकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी मिळेल.मुंबई विद्यापीठात एक सशक्त आणि प्रगतीशील संशोधन संस्कृती रुजण्यास मदत होईल.
या उपक्रमामुळे मुंबई विद्यापीठातील संशोधन क्षमतेत वृद्धी होणार असून आंतर-संस्थात्मक सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. प्रगत आणि उद्योन्मुख क्षेत्रातील संशोधनामुळे संशोधकांसाठी प्रगत संशोधन सुविधा उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे केवळ विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातच नव्हे, तर उच्च शिक्षण क्षेत्रातही एक सकारात्मक बदल घडून येईल. - प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ