‘New Marathi movies to be screened every Friday’ | ‘दर शुक्रवारी होणार नवीन मराठी सिनेमा प्रदर्शित’

‘दर शुक्रवारी होणार नवीन मराठी सिनेमा प्रदर्शित’

मुंबई : मराठी रसिक प्रेक्षक, निर्माते व दिग्दर्शकांची चिंता मिटली आहे. कारण आता प्लॅनेट मराठीच्या डिजिटल थिएटरवर दर शुक्रवारी नवीन सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामुळे रसिकांना घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर चित्रपट पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. ही घोषणा केली ती प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेसचे सीईओ आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी. गुरुवारी ‘लोकमत’ आणि प्लॅनेट मराठी यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेबिनारचे संचालन ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी केले.

लॉकडाऊनच्या काळात थिएटर बंद असल्यामुळे निर्माते व दिग्दर्शक यांना मोठ्या प्रमाणात झळ सोसावी लागली. यापुढेही थिएटर कधी सुरू होतील? याचे उत्तर कोणाजवळच नाही. म्हणूनच प्लॅनेट मराठीने निर्माते व दिग्दर्शकांना त्यांचे चित्रपट आमच्याकडे घेऊन या, ते आम्ही प्रदर्शित करू, असे श्रोत्री यांनी सांगितले आहे. या चित्रपटांच्या तिकिटांचे पैसे थेट निर्मात्यांना मिळतील. तसेच एका क्लिकवर जगभरातील मराठी प्रेक्षक प्लॅनेट मराठीच्या डिजिटल थिएटरसोबत जोडले जातील. मराठी माणूस हा संगीत व चित्रपटावर प्रचंड प्रेम करतो, म्हणूनच येत्या गणपतीत आम्ही हे डिजिटल थिएटर लोकांसमोर आणणार आहोत, असे पुष्कर यांनी स्पष्ट केले. येत्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असलेल्या प्लॅनेट मराठी ओटीटी माध्यमाविषयी प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेसचे सीएमडी आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी अधिक माहिती दिली. मराठी सिनेसृष्टीत चांगले अभिनेते व चांगले दिग्दर्शक आहेत. त्यासोबतच आपला कंटेंटही चांगला आहे. मात्र आपण तो सिनेमा रसिकांपर्यंत पोहोचवण्यास व ब्रँडिंगमध्ये मागे पडत आहोत. अनेक नावाजलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा मराठीला स्थान मिळाले नाही. मराठी ही भारताची दुसऱ्या क्रमांकाची भाषा असूनही आपण ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये मागे पडलो. म्हणूनच मराठी रसिक प्रेक्षकांच्या हक्काचे व दर्जेदार कंटेंट असणारे प्लॅनेट मराठी ओटीटी माध्यम सुरू करण्याचा विचार डोक्यात आला, असे बर्दापूरकर यांनी स्पष्ट केले.

प्लॅनेट मराठी ओटीटी माध्यमावर आठ वर्षांच्या मुलापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या मनोरंजनाची काळजी घेतली जाणार आहे. यामध्ये वेबसीरिज, शॉर्ट फिल्म, कुकिंग शो, कराओके ट्रॅक, संगीत कार्यक्रम, लाइव्ह शो इत्यादी मनोरंजनाच्या उपक्रमांचा भरणा असणार आहे. हे ओटीटी माध्यम म्हणजे संकटात चालून आलेली चांगली संधी आहे. त्यामुळे प्लॅनेट मराठीचे ओटीटी माध्यम रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येताच ते जागतिक पातळीचे मराठी ओटीटी माध्यम बनेल यात शंका नाही, असा विश्वास पुष्कर श्रोत्री आणि अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘New Marathi movies to be screened every Friday’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.