मुंबई : काही दिवसांपूर्वीच पत्नीचे निधन झालेल्या मोहन ओझा यांना बँक बंद पडल्याचा आणखी एक धक्का शुक्रवारी बसला. पत्नी आणि त्यांच्या एकत्रित बँक खात्यावर असलेली रक्कम काढण्यासाठी ते बँकेत आले. मात्र, त्यावेळी बँकेवर निर्बंध लागू केल्याचे त्यांना समजले.
पत्नीच्या खात्यावर केवळ १५ हजार रुपये आहेत. मात्र, मुलाच्या खात्यात लाखो रुपये आहेत. मुलगा पत्नीच्या अस्थिविसर्जनासाठी प्रयागराजला गेला आहे. त्याच्या बँक खात्यात हे पैसे अडकून पडले आहेत. निर्बंध लागू केल्यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी ही माहिती त्याला दिली नाही. नक्की किती पैसे बँकेत अडकले आहेत हे तो आल्यावरच समजेल, अशी व्यथा खातेदार मोहन ओझा यांनी मांडली.
बिल्डरने दिलेले घरभाडे अडकले
अंधेरी पूर्वेकडील गुंदवली भागातील आशीर्वाद चाळ ही पुनर्विकासात गेली आहे. या रहिवाशांना बिल्डरने एका वर्षाचे भाडे दिले खरे. मात्र, यातील काहींचे पैसे बँकेत अडकले. त्यामुळे खोलीचे घरभाडे कसे द्यायचे, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. गीता सोलंकी या ज्येष्ठ नागरिक महिला कुटुंबासह गुंदवली येथील आशीर्वाद चाळेत राहत होत्या. काही महिन्यांपूर्वी ही चाळ एसआरएच्या पुनर्विकासात गेली. त्यामुळे बिल्डरने या रहिवाशांचे स्थलांतरण केले, तसेच त्यांना एका वर्षाचे घरभाडे आगाऊ दिले. या भाड्याचे धनादेश सोलंकी यांनी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील खात्यात जमा केला, तसेच अन्यत्र प्रति महिना २० हजार रुपये भाडे असलेले घर घेतले. मात्र, पैसेच अडकल्याने सोलंकी यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यांचे अडीच लाख रुपये अडकले आहेत.
माझ्या पतींचे निधन झाले आहे. मुलगा अपंग असून, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी मी घरकामासह जुने कपडे गोळा करून पुन्हा विकायला देते. आम्ही बिल्डरने दिलेल्या भाड्याच्या भरवशावर २० हजार रुपये भाड्याचे घर घेतले होते. आता त्याचे भाडे कसे भरणार, असा प्रश्न सोलंकी यांनी उपस्थित केला.
घरखर्च कसा चालवायचा?माझे आणि पतीचे या बँकेत जॉईंट खाते आहे. पतीचा पगाराचा धनादेश कालच बँकेत जमा केला होता. आता हे ३५ हजार रुपये अडकले आहेत. पगारच हातात नसल्याने घरखर्च कसा चालवायचा, हा प्रश्न आहे. आता लॉकरमधील वस्तू घेऊन जाणार आहे, अशी माहिती मीनल काडगे यांनी दिली.
लॉकरमधील वस्तू घरी नेणार
बहिणीचे सासरे अधिक आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी नाशिकला जाणार होते. मात्र, बँकेतून पैसे काढता येणार नाहीत ही बातमी समजताच सर्व सोडून आले. बहिणीचे दोन लाख रुपये अडकले आहेत. तर मी लॉकरमध्ये ठेवलेल्या माझ्या सर्व वस्तू घेऊन घरी जाणार आहे, अशी प्रतिक्रिया संध्या पाणीग्राही यांनी दिली.